ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय असावे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 डिसेंबर 2016

नागपूर - शैक्षणिक आणि आर्थिक उन्नतीसाठी ओबीसींना आरक्षण असले, तरी त्यामध्ये साडेतीनशे जातींचा समावेश आहे. त्यामुळे तेली समाजाच्या वाट्याला नगण्य लाभ येतो. परिणामी गरजू व्यक्‍ती लाभापासून वंचित राहतात. हा तिढा सुटण्यासाठी सरकारने ओबीसींकरिता स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावे; जेणेकरून ओबीसींचे प्रश्‍न आणि समस्या सरकारपर्यंत पोहोचण्यास मदत होईल, अशी अपेक्षा जवाहर विद्यार्थिगृहाच्या पदाधिकाऱ्यांनी ‘सकाळ’ संवादमध्ये व्यक्‍त केली. 

नागपूर - शैक्षणिक आणि आर्थिक उन्नतीसाठी ओबीसींना आरक्षण असले, तरी त्यामध्ये साडेतीनशे जातींचा समावेश आहे. त्यामुळे तेली समाजाच्या वाट्याला नगण्य लाभ येतो. परिणामी गरजू व्यक्‍ती लाभापासून वंचित राहतात. हा तिढा सुटण्यासाठी सरकारने ओबीसींकरिता स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावे; जेणेकरून ओबीसींचे प्रश्‍न आणि समस्या सरकारपर्यंत पोहोचण्यास मदत होईल, अशी अपेक्षा जवाहर विद्यार्थिगृहाच्या पदाधिकाऱ्यांनी ‘सकाळ’ संवादमध्ये व्यक्‍त केली. 

नागपुरात नंदनवन परिसरात संत जगनाडे महाराजांचे स्मारक असले, तरी समाजाची लोकसंख्या बघता सांस्कृतिक किंवा सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी ही जागा अपुरी आहे. तेव्हा शासनाने पुरेशी जागा उपलब्ध करून द्यावी, अशीही अपेक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्‍त केली. 
जवाहर विद्यार्थिगृह ही विदर्भातील अग्रगण्य संस्था असून, गेल्या साठ वर्षांपासून संस्थेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत.

संस्थेचे विद्यार्थिगृह असून, दरवर्षी इथे विविध समाजांतील नामवंत संस्थांमध्ये शिक्षण घेणारे चाळीस ते पन्नास गरजू विद्यार्थी शिक्षणासाठी वास्तव्यास असतात. संस्थेच्या वतीने दरवर्षी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येतो. गरजू होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीही देण्यात येते, असे संस्थेच्या उपाध्यक्षांनी सांगितले. शैक्षणिक सत्राच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांना गणवेश आणि पुस्तकांचे वाटपही करण्यात येते. जवाहर महिला मंच ही महिलांची संघटना असून, जागतिक महिलादिनी कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात येतो. महिलांच्या कलागुणांना वाव देणारा ‘श्रावणसरी’ हा कार्यक्रम आणि मकरसंक्रांतीनिमित्त हळदीकुंकवाच्या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात येते. पंडित नेहरूंच्या जयंतीनिमित्त ज्येष्ठ नागरिकांकरिता दरवर्षी वॉकथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात येते, असेही संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. 

समाजातील विवाहयोग्य युवक-युवतींसाठी निःशुल्क परिचय मेळावा आणि सामूहिक विवाह सोहळ्याचेही संस्थेच्या वतीने आयोजन करण्यात येते. संताजी पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी आरोग्य शिबिराचेही आयोजन करण्यात येते. विदर्भात तेली समाज मोठ्या प्रमाणात असून, आमच्या समाजात साक्षरतेचे प्रमाण ८० ते ९० टक्‍के असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

आज माल्यार्पण व भजन
संत जगनाडे पुण्यतिथीनिमित्त उद्या सकाळी नंदनवन आणि सिव्हिल लाइन्स स्मारक येथील महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून भजन आणि पूजनाचे आयोजन करण्यात आले आहे, असे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले. 

ओबीसींना हवी १०० टक्के फ्रीशिप
ओबीसी विद्यार्थ्यांना महाविद्यालयांत ५० टक्के फ्रीशिप देण्यात येते. ही फ्रीशिप १०० टक्के करण्यात यावी, अशी मागणी जवाहर विद्यार्थिगृहाचे विश्‍वस्त प्रदीप लाखे यांनी केली. शिष्यवृत्तीसाठी ओबीसींची उत्पन्न मर्यादा साडेचार लाखांवरून सहा लाखांपर्यंत करण्यात आली. ही मर्यादा आठ लाख रुपये करण्यात यावी, असेही ते म्हणाले.

Web Title: independent ministry for obc