महापालिकेची स्वतंत्र पोलिस यंत्रणा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 नोव्हेंबर 2016

नागपूर - महापालिकेने पुढील दहा वर्षांचा विचार करीत अधिकारी व कर्मचाऱ्यांचा नवीन आकृतिबंध तयार केला आहे. यात सध्याच्या पदांमध्ये 4,701 पदांची वाढ केली आहे. यात विशेष म्हणजे महापालिकेने स्वतःची पोलिस यंत्रणा तयार करण्याच्या दृष्टीनेही पाऊल उचलले आहे. पोलिस अधिकारी तसेच शिपाईच्या एकूण 82 जागांचा नव्या आकृतिबंधात समावेश करण्यात आला आहे. शुक्रवारी स्थायी समितीने या आकृतिबंधास मंजुरी दिली.

महापालिकेत अधिकारी व कर्मचाऱ्यांची अनेक जुनी पदे काहीही कामाची नाहीत , तर काही नव्या पदांची गरज असल्याने जानेवारीमध्ये महापालिकेचा नवीन आकृतिबंध व सेवाप्रवेश नियमांचा प्रस्ताव तयार करण्यासाठी महापौर प्रवीण दटके यांच्या अध्यक्षतेत समिती गठित करण्यात आली होती. या समितीने तयार केलेला आकृतिबंध स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी आला. त्यास हिरवी झेंडी दिल्याचे स्थायी समिती अध्यक्ष बंडू राऊत यांनी नमूद केले. सध्या महापालिकेत 12 हजार 625 एकूण पदे आहेत. यात आयुक्त, अतिरिक्त उपायुक्त, मुख्य अभियंता, उपायुक्त, सहायक आयुक्त, कार्यकारी अभियंता, अभियंता, कनिष्ठ अभियंता, कुली, मजूर, शिपाई अशी एकूण 268 पदनाम आहेत. हे पदनाम अनेक वर्षे जुने आहेत. यातील सध्याच्या काळात गरज नसलेली कुलीसारखी पदे रद्द करण्यात आली आहे. ही पदे रद्द झाली असली तरी सध्या या पदावर कार्यरत असलेल्यांना नव्या पदनामानुसार शिपाई असे संबोधण्यात येईल. अशाप्रकारे आता महापालिकेत 257 पदनाम राहणार असून, नवीन आकृतिबंध 17 हजार 334 पदांचा आहे. काळानुसार ई-गव्हर्नन्स, घनकचरा व्यवस्थापन, पर्यावरण आदीसाठी नवीन 75 पदनामांचा यात समावेश करण्यात आला आहे. जुने एकूण 79 पदनाम रद्द करण्यात येणार आहे.

सहायक पोलिस आयुक्त प्रमुख
महापालिकेच्या पोलिस यंत्रणेचा प्रमुख सहायक पोलिस आयुक्त राहणार आहे. दोन वरिष्ठ पोलिस निरीक्षक, चार पोलिस निरीक्षक, 15 पोलिस उपनिरीक्षक, 15 हेड कॉन्स्टेबल, 15 महिला कॉन्स्टेबल तर 30 पुरुष कॉन्स्टेबलचा नव्या आकृतिबंधात समावेश करण्यात आला आहे.

Web Title: Independent system Municipal Police