विदर्भवाद्यांच्या मोर्चावर पोलिसांचा लाठीमार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 मे 2018

नागपूर - विधानभवनावर स्वतंत्र विदर्भाचा झेंडा फडकवण्यास निघालेल्या विदर्भावाद्यांच्या मोर्चावर पोलिसांनी लाठीमार केले. यात एक युवक जखमी झाला असला असून शेकडो कार्यकर्त्यांना अटक केली. त्यात ॲड. वामनराव चटप, राम नेवले, डॉ. श्रीनिवास खांदेवाले, ॲड. नंदा पराते आदींचा समावेश होता. 

नागपूर - विधानभवनावर स्वतंत्र विदर्भाचा झेंडा फडकवण्यास निघालेल्या विदर्भावाद्यांच्या मोर्चावर पोलिसांनी लाठीमार केले. यात एक युवक जखमी झाला असला असून शेकडो कार्यकर्त्यांना अटक केली. त्यात ॲड. वामनराव चटप, राम नेवले, डॉ. श्रीनिवास खांदेवाले, ॲड. नंदा पराते आदींचा समावेश होता. 

विदर्भवादी संघटनेतर्फे महाराष्ट्रदिन हा काळा दिवस म्हणून पाळतात. निवडणुकीपूर्वी भाजपने स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती केली जाईल, असे आश्‍वासन दिले होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष  केले जात असल्याने यंदा विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या नेतृत्वात १४ संघटनांनी यशवंत स्टेडियमपासून सोमवारी मोर्चा काढला. विधानभवनावर ते झेंडा फडकावणार होते. सुमारे दीड वाजताच्या सुमारास मोर्चाला प्रारंभ झाला. विदर्भवादी नेते व माजी आमदार ॲड. वामनराव चटप, विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कोअर कमिटीचे वरिष्ठ सदस्य व अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले, निमंत्रक राम नेवले, प्रबीर चक्रवर्ती, नागपूर जिल्हा अध्यक्ष अरुण केदार, विदर्भ  महिला आघाडी अध्यक्ष ॲड. नंदा पराते, पश्‍चिम विदर्भ महिला आघाडीच्या रंजना मामर्डे, ॲड. गोविंद भेंडारकर, शहराध्यक्ष राजू नागुलवार यांच्यासह शेकडो कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते.

जय विदर्भचे फलक घेतलेले कार्यकर्ते घोषणा देत बॅंक ऑफ महाराष्ट्र मार्गे झाशी राणी चौक, सीताबर्डी मेन रोड, लोखंडी पूल, टेकडी गणेश ओव्हरब्रीज, जयस्तंभ चौक मार्गे परवाना भवन चौक येथे पोहोचले. कस्तुरचंद पार्कसमोर कार्यकर्त्यांचा मोर्चा पोलिसांनी अडवला. यामुळे त्यांच्यात बाचाबाची सुरू झाली. कार्यकर्त्यांनी बॅरिकेड्‌स बाजूला सारून विधानभवनाकडे आगेकूच करण्याचा प्रयत्न असता पोलिसांनी बळाचा वापर करून त्यांना रोखले. त्यात रवी वानखेडे नावाचा युवक जखमी झाला. 

आंदोलन चिघळू नये याकरिता नेत्यांना अटक करण्यात आली. ॲड. वामनराव चटप, राम नेवले, डॉ. श्रीनिवास खांदेवाले, ॲड. नंदा पराते, प्रबीर चक्रवर्ती, अरुण केदार, ॲड. नंदा पराते, रंजना मामर्डे, ॲड. गोविंद भेंडारकर, शहराध्यक्ष राजू नागुलवार यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना  ताब्यात घेण्यात आले. सायंकाळच्या सुमारास सर्व कार्यकर्त्यांची सुटका करण्यात आली. 

आंदोलन चिघळविले
वेगळ्या विदर्भाच्या मागणीकरिता शांततेने मोर्चा काढण्यात आला होता. मात्र पोलिसांनी अमानुष लाठीमार केला. पोलिसांनीच आंदोलन चिघळवल्याचा आरोप विदर्भ राज्य आघाडीचे कार्याध्यक्ष नीरज खांदेवाले यांनी केला.

अखेर झेंडा फडकला
विदर्भवाद्यांना पोलिसांनी घेरले होते. विधान भवनाच्या सभोवताल कडक बंदोबस्त ठेवला होता. यामुळे काही युवा कार्यकर्त्यांनी एक शक्कल लढवली. ड्रोन विमानाच्या माध्यमातून विधान भवन परिसरातील एका झाडावर विदर्भाचा झेंडा फडकवण्यात आला. 

पोलिसांचा निषेध
विदर्भवाद्यांना लाठीमार केल्याने ॲड. वामनराव चटप यांनी पोलिस आणि सरकारचा निषेध केला. वेगळा विदर्भ देण्याचे मोदी सरकारमध्ये धमक नाही, असा आरोप करून वामनराव चटप यांनी लाठीमार आणि त्यात जखमी झालेल्याची तक्रार मानवाधिकार आयोगाकडे जाईल, असे सांगितले.

Web Title: independent vidarbha agitation police stick attack crime