'माझी मेट्रो'मुळे भारत-फ्रान्स संबंध दृढ 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 नोव्हेंबर 2016

नागपूर - नागपुरातील मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे बहुतांश काम सौरऊर्जेवर होणार आहे. पर्यावरणपूरक प्रकल्प असल्यामुळेच फ्रान्सने अर्थसाहाय्यासाठी पसंती दिली. नागपूर मेट्रो रेल्वेसाठी कर्ज उपलब्ध करून देणे आनंददायी असून, यामुळे भारत व फ्रान्समधील संबंध आणखी दृढ होतील, असा विश्‍वास फ्रान्सचे भारतातील राजदूत अलेक्‍झांडर झिग्लर यांनी व्यक्त केला. 

नागपूर - नागपुरातील मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे बहुतांश काम सौरऊर्जेवर होणार आहे. पर्यावरणपूरक प्रकल्प असल्यामुळेच फ्रान्सने अर्थसाहाय्यासाठी पसंती दिली. नागपूर मेट्रो रेल्वेसाठी कर्ज उपलब्ध करून देणे आनंददायी असून, यामुळे भारत व फ्रान्समधील संबंध आणखी दृढ होतील, असा विश्‍वास फ्रान्सचे भारतातील राजदूत अलेक्‍झांडर झिग्लर यांनी व्यक्त केला. 

नागपूर मेट्रो प्रकल्पासाठी केंद्रीय आर्थिक व्यवहार विभाग आणि फ्रान्स डेव्हलपमेंट एजन्सी (एएफडी) बॅंक यांच्यात नवी दिल्लीत आज 975 कोटींचा करार झाला. केंद्रीय आर्थिक विकास विभागाचे सहसचिव एस. सेल्वा कुमार, भारतातील फ्रान्सचे राजदूत अलेक्‍झांडर झिग्लर आणि एएफडी बॅंक समूहाचे दक्षिण आशिया विभागाचे संचालक निकोलस फॉरेंज यांनी करारावर स्वाक्षरी केली. केंद्रीय नगर विकास विभाग मंत्रालयाच्या मेट्रो रेल प्रकल्प विभागाचे संचालक जनार्दन प्रसाद, नागपूर मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक ब्रजेश दीक्षित यांच्यासह वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. एएफडी बॅंक समूहाने यापूर्वी बंगळुरू व कोची मेट्रो प्रकल्पाला कर्ज उपलब्ध करून दिले असून नागपूर हे तिसरे शहर ठरले आहे. 20 वर्षांच्या मुदतीसाठी एएफडी बॅंक समूह नागपूर मेट्रोला 975 कोटींचे कर्ज देणार आहे. शहरातील मेट्रो रेल्वेचे काम वेगाने सुरू असून आतापर्यंत 20 टक्के काम पूर्ण झाले असून 2019 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. आजच्या करारामुळे एएफडी बॅंकेंकडून नागपूर मेट्रोच्या महत्त्वाच्या कामांसाठी निधी उपलब्ध होण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे. नागपूर मेट्रोसाठी जागतिक स्तरावरील उत्तम तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात आला आहे. सुरक्षेची पूर्ण काळजी घेण्यात आली असल्याचे ब्रजेश दीक्षित यांनी यावेळी सांगितले. नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड आणि केएफडब्ल्यू बॅंक यांच्यात लवकरच करार होणार असल्याचे ते म्हणाले. 

कर्जातून होणार ही कामे 

एएफडी बॅंक समूहाकडून मिळालेल्या कर्जातून नागपूर मेट्रो प्रकल्पाची अत्याधुनिक सिग्नलिंग, टेलि कॉम, ऑटोमॅटीक फेअर कलेक्‍शन सिस्टिम (एएफसी), लिफ्ट आणि एस्केलेटर सुविधा आदी कामे करण्यात येणार आहेत. 

एएफडी बॅंकेच्या कर्जामुळे मेट्रोच्या कामाला गती येणार असून, प्रकल्प वेळेत पूर्ण होण्यास मदत होणार आहे. नागपूर मेट्रोचे काम प्रगतिपथावर आहे. आतापर्यंत 20 टक्के काम पूर्ण झाले. या प्रकल्पाला लागणाऱ्या एकूण विजेच्या दोन तृतीयांश वीज सौरऊर्जेतून उपलब्ध होणार आहे. 

- ब्रजेश दीक्षित, व्यवस्थापकीय संचालक, नागपूर मेट्रो रेल्वे कार्पोरेशन.

Web Title: India-France relations firm roots