मुख्यमंत्र्यांना देणार इंडियन सफारीची भेट 

मुख्यमंत्र्यांना देणार इंडियन सफारीची भेट 

नागपूर -  गोरेवाडा प्राणिसंग्रहालयातील इंडियन सफारीला 22 जुलैला सुरुवात करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जन्मदिवसाची भेट दिली जाणार आहे. केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने या प्राणिसंग्रहालयाच्या बृहत विकास आराखड्याला हिरवा कंदील दिल्याने विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. 

गोरेवाडा प्राणिसंग्रहालयातील इंडियन सफारी 112 हेक्‍टरमध्ये विकसित करण्यात येत आहे. इंडियन सफारीचे काम अंतिम टप्प्यात आले असून 31 मेपर्यंत बांधकाम पूर्ण करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. इंडियन सफारीमध्ये तृणभक्षक, वाघ, बिबट, अस्वल सफारीचा समावेश राहणार आहे. खासगी आणि सार्वजनिक सहभागातून 564 हेक्‍टरमध्ये इंडियन, अफ्रिकन सफारी, बायो पार्क, नाइट सफारी, बर्ड पार्क विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी एस्सेल वर्ल्डने पुढाकार घेतला असून, बांधा आणि हस्तांतरित करा, या तत्त्वावर हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्यासाठी एफडीसीएम एस्सेल वर्ल्ड गोरेवाडा झू प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची स्थापना करण्यात आलेली आहे. हा प्रकल्प 452 कोटींचा आहे. यात 252 कोटींचा वाटा एस्सेल वर्ल्डचा असून 200 कोटी रुपये राज्य सरकारचे राहणार आहेत. 

यासाठी एफडीसीएम एस्सेल वर्ल्ड गोरेवाडा झू प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची स्थापना झाली आहे. सहा वर्षांत हा प्रकल्प कंपनीला पूर्ण करण्याचा करार आहे. अफ्रिकन सफारीमध्ये झेब्रा, सिंह आणि जिराफ, गेंडा आणण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे. नागपूर शहरापासून 10 ते 12 किलोमीटर अंतरावर गोरेवाडा प्राणिसंग्रहालय विकसित झाल्यानंतर विदर्भात किंवा नागपुरात येणाऱ्या पर्यटकांसाठी नवे पर्यटनस्थळ म्हणून पुढे येणार आहे. वनजमीनवगळता महानगरपालिकेकडून हस्तांतरित केलेल्या 25 हेक्‍टर परिसरात इतर पायाभूत सुविधा उभारण्यात येणार आहेत. त्यात वॉटर पार्क, क्‍लब हाउस, पर्यटकांसाठी निवासी सुविधा, हॉटेल्स, रेस्टॉरंट बांधण्यात येणार आहे. यात पर्यटकांना राहण्याची सोयही केली जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com