बाबा जो निर्णय घेतील, त्यानुसार वाटचाल करू : इंद्रनील नाईक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

नागपूर : बाबांचे अजून काही ठरत नाही. पण ,यावेळी ते न लढण्याच्या विचारात आहेत. त्यामुळे ययाती भाऊ किंवा मला जर लढायचे असेल, तर पक्ष निवडण्याचे स्वातंत्र्य आम्हाला द्या, असे आम्ही म्हटले. दरम्यान पक्षाध्यक्ष शरद पवार, ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे फोन आले आणि बाबा भावुक झाले. निर्णयासाठी त्यांनी "साहेबांकडे' वेळ मागितला आहे. त्यामुळे आमचा सेना प्रवेश तूर्त थांबला आहे. लवकरच ते कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर निर्णय होईल.

नागपूर : बाबांचे अजून काही ठरत नाही. पण ,यावेळी ते न लढण्याच्या विचारात आहेत. त्यामुळे ययाती भाऊ किंवा मला जर लढायचे असेल, तर पक्ष निवडण्याचे स्वातंत्र्य आम्हाला द्या, असे आम्ही म्हटले. दरम्यान पक्षाध्यक्ष शरद पवार, ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे फोन आले आणि बाबा भावुक झाले. निर्णयासाठी त्यांनी "साहेबांकडे' वेळ मागितला आहे. त्यामुळे आमचा सेना प्रवेश तूर्त थांबला आहे. लवकरच ते कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर निर्णय होईल. बाबा जो काही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील आणि त्यानुसारच आम्ही पुढील वाटचाल करू, असे वसंतराव नाईक यांचे नातू आणि शिवसेनेच्या वाटेवर असलेले इंद्रनील नाईक यांनी "सरकारनामा'शी बोलताना सांगितले.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मनोहर नाईक यांचे पुत्र इंद्रनील यांनी शिवसेनेत जाण्याची पूर्ण तयारी केली खरी, पण वडिलांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी या निर्णयाला अद्याप हिरवी झेंडी दाखविली नाही. त्यामुळे नाईकांची सेना प्रवेशाची प्रक्रिया सध्या "स्टॉप' झाली आहे. मनोहर नाईक सेनेत जाण्याच्या तयारीत असतानाच शरद पवार, प्रफुल्ल पटेल आणि जयंत पाटील यांचे फोन मनोहररावांना आले. पक्षश्रेष्ठींनी त्यांनी पक्ष न सोडण्यासाठी आग्रह केला. ज्येष्ठ नेत्यांशी झालेल्या चर्चेत नाईकांनी निर्णय घेण्यासाठी काही दिवसांचा वेळ मागितला आहे.
नाईक जर शिवसेनेत गेले तर महाराष्ट्र आणि गोवा बार असोसिएशनचे अध्यक्ष आशीष देशमुख किंवा यवतमाळ जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष आरती फुफाटे यांच्यापैकी कुणी एक राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून निवडणूक लढणार, हे निश्‍चित आहे. दरम्यान, चार ते पाच दिवसांपूर्वी ऍड. आशीष देशमुख यांनी निवडणुकीच्या उमेदवारीसंदर्भात पत्रकार परिषद घेण्याची तयारी चालविली होती. पण, मनोहर नाईकांनी निर्णय जाहीर करण्यासाठी वेळ मागितल्याने त्यांना पत्रकार परिषद पोस्टपोन करावी लागली. या पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष ख्वाजा बेग पक्षाची भूमिका जाहीर करणार होते. पण, नाईकांचे सद्यस्थितीत तळ्यात-मळ्यात असल्यामुळे राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांनीही त्यांना तूर्त थांबण्याची सूचना केली असल्याची माहिती आहे. उमेदवारीसंदर्भात ऍड. देशमुख यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार आणि पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याचे ऍड. आशीष देशमुख यांनी "सरकारनामा'शी बोलताना सांगितले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नाईकांचे शिवसेनेत "वेलकमच' आहे. पण, त्यांच्या कार्यकर्त्यांनी अद्याप सेना प्रवेशासाठी संमती दर्शविली नाही. नाईकांचे कार्यकर्ते केवळ बंजारा समाजाचेच नाहीत, तर त्यांचा कार्यकर्ता सर्व समाजात विखुरला आहे. "साहेब, आम्ही तुमच्या सोबत येऊ, पण या निर्णयामुळे समाजातील सर्व लोक आमच्या सोबत येतील की नाही, हे सांगता येत नाही.' असे कार्यकर्त्यांनी त्यांनी म्हटले. कार्यकर्ता आपल्यासाठी मोठा आहे. त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांची तयारी असेल, तरच सेनेत जायचे नाही तर आहे तेथेच राहायचे, असे तूर्त मनोहर नाईकांनी ठरविले असल्याचे सांगण्यात येते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: indraneel niak hold the decision