इंद्रावती नदीत आणखी 15 मृतदेह

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 एप्रिल 2018

गडचिरोली - ताडगावनजीकच्या बोरिया जंगलात रविवारी झालेल्या चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्यांचा आकडा आणखी वाढला असून, नजीकच्या इंद्रावती नदीत नक्षलवाद्यांचे आणखी 15 मृतदेह सापडले आहेत. या चकमकीतील मृतांचा आकडा 31 वर पोचला आहे. दुसऱ्या दिवशी (सोमवार) झालेल्या चकमकीतील सहाचा आकडा धरून 48 तासांत सुरक्षा दलाने तब्बल 37 नक्षलवाद्यांना ठार केले. या घटनेमुळे पोलिसांचे मनोबल उंचावले असून, आजपर्यंतच्या इतिहासात नक्षलवाद्यांना सर्वांत मोठा धक्का बसला आहे.

"सी-60' पथक व "सीआरपीएफ'च्या क्रमांक नऊ बटालियनच्या पोलिसांनी शनिवारी (ता. 21) रात्री बोरिया जंगलात नक्षलवाद्यांना घेरले होते. दुसऱ्या दिवशी पहाटे झालेल्या चकमकीत मोठ्या संख्येत नक्षलवादी ठार झाले. चकमकीनंतर 16 नक्षलवाद्यांचे मृतदेह घटनास्थळी आढळून आले. त्यात साईनाथ व सिनू या वरिष्ठ व जहाल नक्षलवादी म्होरक्‍यांचा, तसेच सिनूची पत्नी शांता यांचा समावेश होता. त्यानंतर काल (ता. 23) घटनास्थळ परिसरात पोलिसांनी पाहणी केली असता इंद्रावती नदीच्या पात्रात नक्षलवाद्यांचे काही मृतदेह असल्याचे लक्षात आले. पात्रात शोध घेतला असता आणखी 15 नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले, अशी माहिती अतिरिक्त पोलिस महासंचालक डी. कनकरत्नम यांनी आज गडचिरोली येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. रविवारी घटनास्थळी आढळलेले 16 व इंद्रावतीत सापडलेले 15 मृतदेह, असे एकूण 31 नक्षलवादी या चकमकीत ठार झाले.

सोमवारी रात्री राजाराम खांदला-नैनेर परिसरातही पोलिस दलाची नक्षलवाद्यांच्या आणखी एका तुकडीशी चकमक झाली. त्यात पोलिसांनी सहा नक्षलवाद्यांना ठार केले. अशा प्रकारे 48 तासांमध्ये पोलिसांनी यमसदनी पाठवलेल्या नक्षलवाद्यांची संख्या 37 वर पोचली आहे. नैनेरच्या चकमकीत ठार झालेल्या सहा नक्षलवाद्यांचे मृतदेह आज गडचिरोलीला आणण्यात आले आहेत. त्यात दोन पुरुष व चार महिला आहेत. या सहा जणांत अहेरी दलम कमांडर नंदू ऊर्फ वासुदेव आत्राम याचाही समावेश आहे. अन्य मृतांपैकी चौघांची ओळख पटली असून त्यांची नावे क्रांती (प्लॅटून 7 ची सदस्य), कार्तिक उईके रा. कटेझरी (प्लॅटून 7 चा सदस्य), जयशीला गावडे रा. बिनागुंडा (अहेरी एलओएस सदस्य) व लता वड्‌डे (अहेरी एलओएस सदस्य) अशी आहेत.

31 - बोरियाच्या चकमकीतील ठार नक्षलवादी
37 - दोन दिवसांत ठार झालेले नक्षलवादी

Web Title: indravati river 15 naxalite death body