पोलिस पथकावर कुख्यात गुंडाचा हल्ला

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जुलै 2019

नागपूर : एका मुलीला मारहाण करणाऱ्यांना अटकाव करण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकावर एका कुख्यात गुंडाने साथीदाराच्या मदतीने दगडफेक करून त्यांना जखमी करून शासकीय वाहनांची तोडफोड केल्याची घटना वाडी हद्दीत घडली.

नागपूर : एका मुलीला मारहाण करणाऱ्यांना अटकाव करण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकावर एका कुख्यात गुंडाने साथीदाराच्या मदतीने दगडफेक करून त्यांना जखमी करून शासकीय वाहनांची तोडफोड केल्याची घटना वाडी हद्दीत घडली.
सतीश ताराचंद चन्ने (27) आणि शैलेश मधुकर काळे (19,नागोबा मंदिरजवळ, अंबाझरी) अशी आरोपींची नावे आहेत. सतीश चन्ने हा कुख्यात गुंड असून त्याच्यावर विविध पोलिस ठाण्यात शंभरावर गुन्हे दाखल आहेत. सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास सतीश आणि शैलेश हे एका मुलीला घेऊन वाडी हद्दीतील वायुसेना गेटच्या मागील रोडवर बसले होते. कसल्यातरी कारणावरून त्यांचा मुलीसोबत वाद झाल्याने दोघांनीही तिला मारहाण करायला सुरूवात केली. कुणीतरी ही माहिती शहर नियंत्रण कक्षाला दिली. माहिती मिळताच गस्तीवर असलेले हेड कॉन्स्टेबल सुरेश मांढरे आणि शिपाई नितीन करडभाजने हे घटनास्थळी गेले. पोलिस त्यांना विचारपूस करीत असताना सतीशने शिपाई नितीनची कॉलर पकडून त्याला शिवीगाळ केली. त्याचप्रमाणे शैलेशने नितीनला पकडून सतीशने मारहाण केली. हेड कॉन्स्ट्रेबल मांढरे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता दोघांनीही दोन्ही शिपायांवर दगडफेक करून त्यांना जखमी केले. त्याचप्रमाणे पोलिस वाहनाच्या काचा फोडून वॉकटॉकी फोडली. पोलिसांनी नियंत्रण कक्षाला ही माहिती दिल्यानंतर वाडी पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. त्यानंतर दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, घटनास्थळाहून मुलगी पळून गेली.
याप्रकरणी हेड कॉन्स्टेबल मांढरे यांच्या तक्रारीवरून वाडी पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून सतीश आणि शैलेश यांना अटक केली. सतीश हा कुख्यात गुंड असून त्याच्याविरुद्ध शहरातील विविध पोलिस ठाण्यात दरोडा, खून, खुनाचा प्रयत्न, दुखापत, मंगळसूत्र पळविणे असे शंभरावर गुन्हे दाखल आहेत.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Infamous hooligan attack on a police squad