कपाशीवर लाल्या; नरखेड, हिंगणा तालुक्‍यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

पांढरे सोने अशी ओळख असणाऱ्या कापूस पिकाचे क्षेत्र वाढूनसुद्धा निसर्गाने लाल्या व कीड आणि रोगाने ग्रासल्याने कापूस उत्पादनात मोठ्या घट होण्याची शक्‍यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. 

हिंगणा, जलालखेडा (जि. नागपूर)  : उशीरा सुरू झालेला मानसून दीर्घ काळ टिकाला तर त्यानंतर परतीच्या पावसाने थैमान घालून शेतकऱ्यांना जेरीस आणले. पिकांची मोठी हानी झाली, विशेषत: कपाशीवर याचा मोठा परिणाम झाला आहे. अशातच आता लाल्या  कपाशीवर दिसू लागल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. 

नरखेड तालुक्‍यात कपाशीची लागवड झाल्यानंतर सतत पाऊस सुरू राहिल्यामुळे व दूषित हवामानामुळे कापसाच्या झाडावरील फुलाची व पात्यांची गळ झाली आहे. जास्त पावसावर तग धरून राहिलेल्या कपाशीवर लाल्या रोगाने थैमान घातल्याने पुन्हा शेतकऱ्यांवर अडचणीचा सामना करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शेतकरी लाल्या  नियंत्रणासाठी महागडे औषधांची खरेदी करून फवारणी करताना दिसत आहेत. गेल्या वर्षीचा दुष्काळ आणि या वर्षी पुन्हा लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाला असल्याने नरखेड तालुक्‍यातील शेतकरी पुन्हा चिंताग्रस्त झाला आहे. पांढरे सोने अशी ओळख असणाऱ्या कापूस पिकाचे क्षेत्र वाढूनसुद्धा निसर्गाने लाल्या व कीड आणि रोगाने ग्रासल्याने कापूस उत्पादनात मोठ्या घट होण्याची शक्‍यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. 

कापसाच्या प्रतवारी घसरण
हिंगणा तालुक्‍यात खरीप पिकाखाली 36 हजार 766 हेक्‍टरपैकी कापसाचा पेरा 23 हजार 800 हेक्‍टरमध्ये आहे. तर तालुक्‍यातील हिंगणा, वानाडोंगरी, गुमगाव, टाकळघाट, अडेगाव व कान्होलीबारा महसूल मंडळातील अनेक गावांतील कपाशीवर लाल्या दिसू लागल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. परतीच्या पावसामुळे कापसाच्या प्रतवारी घसरण झाली असताना आता पुन्हा लाल्या रोगाचा प्रकोप झाल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. 

उत्पादन कमी होणार 
लाल्याचा प्रकोप झाल्यास पिकाची वाढ पूर्णत: खुंटते, नवीन बोंड कपाशीला येत नाही. प्रकोप जास्तीच वाढला तर संपूर्ण झाड वाळतात. पिकांना वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी तीन ते पाचवेळा महागडी औषधी फवारली. परंतु, त्याचा काही एक उपयोग झाला नाही. उलट झाडाला लागलेल्या पात्या बोंडे कमी प्रमाणात लागल्याने कपाशीच्या बोंडाचे प्रमाणही घटू लागले असल्याने शेतकरी वर्ग पूर्णतः धास्तावला आहे. यामुळे हजारो हेक्‍टर क्षेत्रावरील कपाशीचे पीक बाधित झाले आहे. उत्पादन कमी होणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. 

नुकसानापासून शेतकरी वंचित 
हिंगणा तालुक्‍यात दिवाळीत परतीचा पाऊस पडला. या पावसाचा फटका कपाशीला बसला. या पाण्यामुळे कापसाच्या प्रतवारीत घसरण होणार असल्याचे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. यानंतर शासनाच्या आदेशानुसार तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायकांनी संयुक्तरित्या केलेल्या अहवालात 33 टक्‍के पेक्षा जास्त नुकसान तालुक्‍यात परतीच्या पावसाचे झाले नाही, अशी नोंद केली. यामुळे परतीच्या पावसाच्या नुकसानातून हिंगणा तालुक्‍याला शासनाने वगळले आहे. त्यामुळे आतातरी तातडीने कृषी विभागाने सर्वेक्षण करून लाल्या रोगांचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. 

सर्वेक्षण करण्याचे काम सुरू
कपाशीवर लाल्या आहेच. जुलै ते ऑक्‍टोबर महिन्यापर्यंत झालेल्या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांना निंदण व फवारणीसाठी सवड मिळाली नाही. यामुळे लाल्या आला व ज्यावर लाल्या आहे. त्याचे शंभर टक्‍के नुकसान झाल्याचे समजून सर्वेक्षण करण्याचे काम सुरू आहे. तालुक्‍यात 30 हजार हेक्‍टरवर कापूस पिकाची लागवड करण्यात आलेली आहे. पण, अशामुळे खर्च शेतकऱ्यांवर संकटच कोसळले आहे. 
- योगीराज जुमळे,  तालुका कृषी अधिकारी, नरखेड 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Influence of disease on cotton