विद्यार्थ्यांसाठी दीक्षारंभ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

नागपूर : महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना शिस्त लावणे, अभ्यासक्रमांची माहिती आणि सामाजिक जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) "दीक्षारंभ' या उपक्रमास सुरुवात केली आहे. तसे अधिकृत पत्र आणि उपक्रमांची नियमावली विद्यापीठ आणि महाविद्यालयांना पाठविली आहे.

वरिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेताना विद्यार्थी संपूर्णत: नवा असतो. मनात विविध प्रश्‍न आणि एखाद्या गोष्टीविषयीचे भय त्याच्या मनात असते. त्यामुळे त्याला या वातावरणाशी जुळवून घेताना बराच वेळ लागतो. यादरम्यान त्याला योग्य मार्गदर्शनाची गरज असते. त्याने निवडलेला अभ्यासक्रम, त्यातील अनुभवी शिक्षक आणि इतर गोष्टींमध्येही त्याला कळायला बराच वेळ लागत असतो. त्यामुळे बहुतांश महाविद्यालयांत एकदिवसीय कार्यक्रम घेऊन नव्या विद्यार्थ्यांना त्याची जाणीव करून दिली जाते. मात्र, आपल्या आयुष्यातील महत्त्वाची तीन वर्षे घालविणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक दिवस बराच कमी पडत असल्याने अनुदान आयोगाने प्रत्येक महाविद्यालय आणि विद्यापीठात किमान एक आठवडा "दीक्षारंभ' उपक्रम राबविण्याचे आवाहन केले आहे. यामध्ये विशिष्ट सामाजिक व्यक्तीचे व्याख्यान आयोजित करून त्याच्यात सामाजिक जाणीव रुजविणे, महाविद्यालयासह विद्यापीठातील विविध ठिकाणांना भेटी देत, त्यांची माहिती देणे, नियमांची माहिती आणि शिस्तीचे पालन करण्यास सांगणे, विविध विषयांचे व्याख्यान, तज्ज्ञांचे मार्गदर्शन देणे अपेक्षित आहे. केवळ मानसिकच नव्हे, तर संस्कृती आणि शारीरिक संपन्नतेसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन यूजीसीने केले आहे. यासाठी नियमावलीत कार्यक्रमांची यादीही देण्यात आली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Initiation for students