अर्ध्यावरती डाव मोडला..!

छायाचित्र
छायाचित्र

नागपूर : विवाहितेचे गावातीलच व्यक्तीसोबत सूत जुळले. त्याचा हात धरून तिने सासरचा उंबरठा ओलांडला. दोघेही पती-पत्नीप्रमाणे राहू लागले. अल्पावधितच तोसुद्धा सोडून निघून गेला. याच नैराश्‍यातून महिलेने आत्महत्या केली आणि लिव्ह इन रिलेशनशिपचा दुर्दैवी अंत झाला. एमआयडीसीतील अमरनगरात घडलेल्या या प्रकरणात प्रियकर विनय नाथ व त्याचा जावई दुर्गेश नाथ यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुजाता नाथ (29) असे मृत महिलेचे नाव आहे. ती मूळची नागपूरची रहिवासी असून मध्य प्रदेशातील सिवनीचा राहणारा मनीष नाथ (29) याच्यासोबत लग्न झाले. दोघेही मिळून सिवनी येथे शेती करीत होते. सुखी संसार सुरू असतानाच त्यांना मुलगाही झाला. सिवनीचाच राहणारा विनय नाथ हा दुधाचा व्यवसाय करायचा. दूध विक्रीसाठी घरी येत असल्याने सुजाता आणि त्याचे सूत जुळले आणि मनीषसोबत सुरू असलेल्या सुखी संसारात मिठाचा खडा पडला. दोघांनीही पळून जाण्याचा निर्धार केला. पण, जायचे कुठे, हा प्रश्‍न त्यांच्यापुढे होता. सुजाता मूळची नागपूरची असल्याने त्यांनी नागपूर गाठून मजुरी करण्याचे ठरविले. सुजाता आपल्या चार वर्षीय मुलालाही सोबत घेऊन आली. अमरनगरात भाड्याची खोली घेऊन ते सोबत राहू लागले. लवकरच त्यांच्यातही वाद सुरू झाला. काही दिवसांमध्येच विनयही तिला सोडून निघून गेला. तिने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता विनयचा जावई दुर्गेशने पती व मुलाला ठार मारण्याची धमकी दिली.
विश्‍वास टाकला त्यानेच विश्‍वासघात केला, शिवाय पतीला सोडल्याची अपराधिक भावना, समाजात झालेली बदनामी, यामुळे सुजाताला नैराश्‍याने गाठले. त्यातूनच घरीच गळफास लावून तिने आत्महत्या केली. 27 सप्टेंबर रोजी ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी प्रारंभी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. तपासांत पोलिसांना सुजाताने मृत्यूपर्वी लिहिलेली चिठ्ठी सापडली. त्यात सुजाताने आपल्या मृत्यूसाठी विनयला दोषी ठरविले आहे. तपासांत पुढे आलेल्या बाबी आणि मनीषने दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी विनय व दुर्गेशविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल केला आहे. तिकडे आईचे छत्र हरविलेला मुलगा आजारी असून वडील न्यायासाठी त्याला सोबत घेऊन फिरत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com