अर्हता परीक्षा नापासांच्या चौकशीचे आदेश 

Inquiry order for who failed in qualifying examination of PSI
Inquiry order for who failed in qualifying examination of PSI

नागपूर : पोलिस महासंचालकाच्या अधिनस्थ 2013 मध्ये घेण्यात आलेल्या हवालदारांच्या अर्हता परीक्षेत नापास झालेल्यांना पोलिस उपनिरीक्षक पदी पदोन्नती दिल्याचा धक्‍कादायक प्रकार 'सकाळ'ने उघडकीस आणला होता. 'सकाळ'च्या वृत्ताची पोलिस महासंचालकांनी गांभीर्याने दखल घेतली. नापास असतानाही बढती झालेल्या काही पोलिस हवालदारांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. 

कर्तव्यनिष्ठ आणि पोलिस खात्याची सलग 16 वर्षे सेवा करणारा हवालदार पोलिस अधिकारी म्हणून सन्मानाने सेवानिवृत्त व्हावा, असे स्वप्न तत्कालिन पोलिस महासंचालक संजीव दयाळ यांनी बघितले होते. त्यामुळे 2013 मध्ये राज्यभरात पोलिस हवालदारांची अर्हता परीक्षा (एचसीपीटीसी) घेण्यात आली होती. या परीक्षेत जवळपास 18 हजार हवालदार उत्तीर्ण झाले. परीक्षा पास झालेल्यांना आतापर्यंत नऊ वेळा पदोन्नती दिली आहे.

अजुनही 13 हजार उत्तीर्ण झालेले हवालदार पदोन्नतीसाठी ताटकळत आहेत. पोलिस उपनिरीक्षकासाठी लावण्यात आलेल्या सेवाजेष्ठता यादीत पोलिस महासंचालक कार्यालय आणि आस्थापना विभागातील अधिकाऱ्यांनी पोलिस कर्मचाऱ्यांकडून पदोन्नतीसाठी पैसे घेऊन कोट्यवधीचा घोटाळा केल्याची राज्य पोलिस दलात चर्चेचा विषय ठरत आहे. अनेक नापास हवालदारांना पीएसआय पदी बढती दिली तर उत्तीर्णांना मात्र, वेटिंगवर ठेवल्याचे वृत्त 'सकाळ'ने प्रकाशित केले होते. पोलिस महासंचालक कार्यालयाचे विशेष पोलिस महानिरीक्षक (आस्थापना) डॉ. कुलवंत कु. सारंगल यांनी नापास झाल्यानंतर पदोन्नती घेणाऱ्या हवालदारांची 5 फेब्रूवारीपासून चौकशी सुरू केली आहे. त्यामुळे मोठा घोळ बाहेर निघण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. 

परीक्षाच नाही तरीही उत्तीर्ण -
नाशिक शहर इंदिरानगर पोलिस ठाण्याची हवालदार सुशिला कोरडवाल या अर्हता परीक्षेत नापास झाल्या होत्या. तरीही त्यांना पोलिस उपनिरीक्षकपदी पदोन्नती देण्यात आली. त्यांची 5 फेब्रुवारीला एडीजी सारंगल यांनी चौकशी केली. तसेच मुंबई शहर येथील सुनील प्रभू यांनी अर्हता परीक्षाच दिली नाही. तरीही त्यांना पीएसआय म्हणून पदोन्नती दिल्याचा प्रताप महासंचालक कार्यालयाने केला. 

यादीतील नावांमध्ये घोळ -
परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर 16 हजार पोलिस हवालदारांची सेवाजेष्ठता यादी घोषित करण्यात आली होती. मात्र, या यादीत तब्बल 3 हजार हवालदारांचे नाव बोगस आहेत. तसेच अनेकांची नावे यादीत पुन्हा-पुन्हा टाकण्यात आली होती. अमरावती (ग्रामीण) या शहर पोलिस दलातील उत्तीर्ण हवालदारांचा यादीत उल्लेखच नव्हता. त्यामुळे यामध्ये मोठा आर्थिक व्यवहार झाल्याची शक्‍यता आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com