बायकोच्या आग्रहाखातर छोट्या पडद्यावर आलो

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 ऑगस्ट 2019

नागपूर : मी रंगभूमीचा नट होतो. माझ्यातील विनोदशैली हेरून "फू बाई फू' मालिकेत काम करण्याबाबत विचारणा झाली. कधीही कॅमेऱ्यासमोर काम न केल्याने आत्मविश्‍वास नव्हता. म्हणून दोनदा नकार दिला. तिसऱ्यांदा बायकोच्या आग्रहाखातर छोट्या पडद्यावर काम करण्याचा निर्णय घेतला अन्‌ आयुष्याची गणितेच बदलली. पुरुषाच्या पाठीशी स्त्री उभी राहिली की, जगण्याचे सोने होत असल्याचे मत ज्येष्ठ अभिनेते भाऊ कदम यांनी व्यक्‍त केले.

माध्यम लोकसेवा प्रतिष्ठानतर्फे आत्मनिर्भर नारीच्या कर्तृत्वाला सलाम करणारा संगीतमय कार्यक्रम रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून भाऊ कदम उपस्थित होते. सिनेकलावंत काजल काटे यांनी भाऊ कदम यांची मुलाखत घेतली. इस्टंट विनोद कसे सुचतात, या प्रश्‍नावर भाऊ कदम यांनी ही अनेक वर्षांची तपश्‍चर्या असल्याचे सांगितले. नट अभिनयात शिरला की सारेच आपसूक घडते, तसे माझ्यातल्या विनोदांचे झाल्याचे भाऊंनी सांगितले.
एका प्रेक्षकाने त्यांना अमिताभ यांचा अभिनय करून दाखविण्याची विनंती केली. भाऊ कदम यांनी अशा नकला सागर करंडे यालाच जमतील, मला प्रचंड सराव करावा लागत असल्याचे सांगितले. प्रेक्षकांच्या आग्रहास्तव भाऊंनी "आला बाबुराव' या तुफान गाजलेल्या गाण्यावर महिला प्रेक्षकांसोबत ठेकाही धरला व "चंदन सा बदन' हे गीत गायले.
भाऊ कदम यांच्या भाषणापूर्वी महिलांना काजल राजवैद्य यांनी सक्षमिकरणाचा मंत्र दिला. आर्थिक, सामाजिक व मानसिक गरज ओळखा आणि व्यवसायाची निवड करून सक्षम व्हा, असे आवाहन केले. रक्‍ताच्या नात्यांसह एक हक्‍काचा आधार लागतो. तो माध्यम सेवा प्रतिष्ठान देईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला.
या प्रसंगी हेरिटेज संवर्धनासाठी लीना झिलपे, सामाजिक कार्यासाठी नेहा जोशी, सुनंदा खोब्रागडे, कवयित्री वर्षा ढोके सय्यद, प्रणिमित्र स्मिता मिरे, अभिनेत्री काजल काटे, निवेदिका रूपाली मोरे यांचा भाऊ कदम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. श्रुती पांडवकर हिच्या गीताने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: On the insistence of the wife came to the small screen