नोटांवरील स्वच्छतेच्या संदेशामागे नागपूरकराची प्रेरणा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

नागपूर : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी दिलेला स्वच्छतेचा संदेश सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचावा तसेच त्यांच्यात स्वच्छतेची भावना जागृत व्हावी, यासाठी भारत सरकारने चलनी नोटावर स्वच्छतेचा लोगो व स्लोगन प्रकाशित केला. नोटावर अशाप्रकारचा लोगो असावा, अशी सूचना खुद्द एका नागपूरकरानेच सरकारला केली होती, हे उल्लेखनीय. 

नागपूर : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी दिलेला स्वच्छतेचा संदेश सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचावा तसेच त्यांच्यात स्वच्छतेची भावना जागृत व्हावी, यासाठी भारत सरकारने चलनी नोटावर स्वच्छतेचा लोगो व स्लोगन प्रकाशित केला. नोटावर अशाप्रकारचा लोगो असावा, अशी सूचना खुद्द एका नागपूरकरानेच सरकारला केली होती, हे उल्लेखनीय. 
देशातील नव्या चलनी नोटांवर गोल चक्राकार राष्ट्रपिता महात्मा गांधींचा चष्मा व त्याखाली असलेले "एक कदम स्वच्छता की ओर' हे स्लोगन अधोरेखीत करण्यात आले आहे. मुळात ही संकल्पना नागपूरचे राजेश जाधव व त्यांच्या संस्थेची आहे. कर्नल पी. वाय. जाधव बहुउद्देशीय संस्थेअंतर्गत स्वच्छ भारत मित्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष असलेले राजेश जाधव यांनी भारतीय चलनावरील नोटांवर "स्वच्छ भारत मिशन' लोगो प्रकाशित करण्यात यावा, अशी आग्रही सूचना केंद्र सरकारकडे एका पत्राद्वारे फेब्रुवारी 2016 मध्ये केली होती. त्यांनी हे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदींसह राष्ट्रपती, रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर व वित्त मंत्रालयालाही पाठविले होते. त्यांच्या या सूचनेला सरकारने गांभीर्याने घेतले. त्यावर मंथन झाल्यानंतर जाधव यांची सूचना मान्य करण्यात आली. 
"आरबीआय ऍक्‍ट' 1934 च्या "सेक्‍शन 25'नुसार या सूचनेचा समावेश नोटांवर करता येऊ शकतो, असे रिझर्व्ह बॅंकेच्या तत्कालिन गव्हर्नरला वाटले. तसे त्यांनी 22 मार्च रोजी जाधव यांना पत्राद्वारे कळविले. अखेर 24 ऑगस्ट 2016 रोजी वित्त मंत्रालयाने रिझर्व्ह बॅंकेला पाठवून "स्वच्छ भारत मिशन'ची चांगली सूचना स्वीकृत करावी, अशी सूचना केली. त्यानंतर नवीन नोटांवर लोगो व स्लोगन प्रकाशित करण्यात आले. तब्बल तीन वर्षांनंतर (19 एप्रिल 2019 रोजी) आम्ही तुमच्या सूचनेचा समावेश केल्याचे टपालाद्वारे पत्र चलनी व नाणे विभागाचे संचालक मनमोहन सचदेव यांच्याकडून जाधव यांना प्राप्त झाले. नागपुरातील एका संस्थेची संकल्पना देशाने स्वीकारल्याबद्दल जाधव यांनी आनंद व्यक्‍त केला. तमाम नागपूरकरांसाठी ही अभिमानाची बाब आहे. महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीच्या पार्श्‍वभूमीवर जाधव यांनी "सकाळ' कार्यालयाला भेट देऊन ही माहिती दिली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Inspiration of Nagpurkaras behind the message of cleanliness on the notes