प्रेरणादायी! नरेश पटले यांच्या यकृतदानातून महिलेला जीवनदान 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

नागपूर : जो दुसऱ्यांसाठी जगला तोच खरं जगला, असे म्हणतात. काही माणसे मृत्यूनंतरही दुसऱ्यांसाठी जगतात. उपराजधानीने हा अनुभव दसऱ्याला अनुभवला. 43 वर्षांचे नरेश पटले यांना मेंदूचा आघात झाला. पटले यांनी जगाचा निरोप घेताना इतरांच्या जीवनात प्रकाश पेरला. यकृत दानातून नागपुरातील महिलेस जीवनदान दिले. दोन अंध बांधवांना नजर देऊन डोळ्यात उजेड पेरला. लकडगंज येथील न्यू इरा हॉस्पिटलमध्ये यकृत प्रत्यारोपण झाले. 

नरेश पटले हे मूळचे गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्‍यातील तिरखेडी गावचे रहिवासी. सोमवारी पटले यांना मेंदूचा आघात झाला. गोंदिया येथील रुग्णालयात प्रथम उपचार केले. यानंतर न्यू इरा हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान रुग्णाकडून प्रतिसाद मिळत नव्हते. न्यूरो सर्जन डॉ. नीलेश अग्रवाल यांनी केलेल्या तपासणीतून पटले यांच्या मेंदूच्या पेशी मृत पावल्याचे लक्षात आले. पटले यांच्या अवयवदानाविषयी हृदयप्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. आनंद संचेती, कार्डिऑलॉजिस्ट डॉ. निधेश मिश्रा यांच्या पथकाने नातेवाइकांचे समुपदेशन केले. नातेवाइकांनी अवयवदानासाठी होकार दिल्यानंतर विभागीय प्रत्यारोपण समितीला सूचना देण्यात आली. 
विभागीय समितीच्या अध्यक्ष डॉ. विभावरी दाणी, सचिव डॉ. रवी वानखेडे यांनी यकृतदानासह इतरही अवयवदानासंदर्भातील यादी तपासली. जरीपटका भागातील महिला यकृताच्या प्रतीक्षेत असल्याचे आढळले. तत्काळ या महिलेच्या नातेवाइकांना कळवले. दुसऱ्याच दिवशी यकृत प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. राहुल सक्‍सेना, डॉ. विजयेंद्र किरणके, डॉ. साहिल बंसल, डॉ. सविता जैस्वाल यांच्या वैद्यकीय पथकाने अवयव मिळविण्याची प्रक्रिया सुरू केली आणि लगेच यकृताचे प्रत्यारोपण करून महिलेस जीवनदान देण्यात आले. पटले यांचे दोन्ही डोळे महात्मे नेत्रपेढीच्या स्वाधीन करण्यात आले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Inspirational! Naresh Patil's Giving Life