शैक्षणिक पुस्तके खरेदीऐवजी वाचनालये दुरुस्तीवर भर 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 मे 2019

महापालिकेत कुठल्याही देखभाल दुरुस्तीवरच अधिक खर्च केला जात असल्याची अनेक उदाहरणे आहेत. आता वाचनालयेही याला अपवाद नाहीत. वाचनालयांत पुस्तकांचे महत्त्व सर्वश्रुत आहे.

नागपूर - महापालिकेत कुठल्याही देखभाल दुरुस्तीवरच अधिक खर्च केला जात असल्याची अनेक उदाहरणे आहेत. आता वाचनालयेही याला अपवाद नाहीत. वाचनालयांत पुस्तकांचे महत्त्व सर्वश्रुत आहे. मात्र, महापालिकेने गेल्या काही वर्षांत पुस्तक खरेदीवरील खर्चाच्या तुलनेत दुप्पट निधी वाचनालये दुरुस्तीवर खर्च केला. त्यामुळे दुरुस्तीच्या कामावरच महापालिका अधिकाऱ्यांचे प्रेम का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. 

मनपाची 33 वाचनालये आहेत. त्यांतील पुस्तकांऐवजी प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी केवळ दुरुस्तीबाबत गंभीर असल्याचे आरटीआय कार्यकर्ते अभय कोलारकर यांना माहिती अधिकारात दिलेल्या माहितीतून आढळले. गेल्या तीन वर्षांत खरेदी केलेल्या एकूण पुस्तकांत केवळ 33 टक्के शैक्षणिक पुस्तके खरेदी करण्यात आल्याने गरजू विद्यार्थ्यांनाही सुविधा देण्यात हात आखडता घेतल्याचे चित्र आहे. पुस्तक खरेदी किंवा पुस्तकांच्या देखभालीऐवजी ग्रंथालयाच्या दुरुस्तीवरच अधिक खर्च करण्यात आला आहे. वाचनालये अत्याधुनिक करण्याच्या नादात त्यातील पुस्तकांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे चित्र आहे. गेल्या तीन वर्षांत महापालिकेने केवळ 8 लाख 93 हजारांची पुस्तके खरेदी केली. त्या तुलनेत वाचनालयाच्या दुरुस्तीवरच 25.61 लाख रुपये खर्च करण्यात आलेत. त्यामुळे वाचनालयाच्या दुरुस्तीवर "वरकमाई' असल्याने पुस्तक खरेदीऐवजी त्याकडेच जास्त लक्ष पुरविले जात असल्याची चर्चा यानिमित्त रंगली आहे. महापालिकेने तीन वर्षांत 3 हजार 922 पुस्तके खरेदी केली. मात्र, यात केवळ 1 हजार 413 पुस्तके शैक्षणिक असल्याची माहिती महापालिकेनेच स्पष्ट केली. त्यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक पुस्तके उपलब्ध करून देण्याबाबतही महापालिका गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. 

पुस्तके खरेदी व दुरुस्तीवरील खर्चात तफावत 
वर्ष पुस्तकांवरील खर्च दुरुस्तीवरील खर्च पुस्तकांची संख्या शैक्षणिक पुस्तके 
2016-17 6 लाख 2 हजार 11 लाख 6 हजार 2,836 997 
2017-18 94 हजार 11 लाख 57 हजार 311 76 
2018-19 1 लाख 97 हजार 2 लाख 99 हजार 775 340 

Web Title: Instead of buying educational books library repairs