नागपुरातून धावणार आंतरजिल्हा लोकल रेल्वे 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

नागपूर - मुंबईप्रमाणे नागपूर आणि शेजारचे जिल्ह्यांदरम्यान लवकरच लोकल रेल्वे धावताना दिसणार आहे. मेट्रो रेल्वेने आजूबाजूचे जिल्हा आणि तालुक्‍यांना जोडण्यासाठी चार डब्यांची लोकल सुरू करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. त्यास केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने मान्यता दिली आहे. 

नागपूर - मुंबईप्रमाणे नागपूर आणि शेजारचे जिल्ह्यांदरम्यान लवकरच लोकल रेल्वे धावताना दिसणार आहे. मेट्रो रेल्वेने आजूबाजूचे जिल्हा आणि तालुक्‍यांना जोडण्यासाठी चार डब्यांची लोकल सुरू करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. त्यास केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने मान्यता दिली आहे. 

दोन महिन्यांपूर्वी नागपूर मेट्रो रेल्वेने रेल्वेच्या मार्गांवरून लोकल सुरू करण्याचा प्रस्ताव केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सादर केला होता. अलीकडेच गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री यांची भेट घेतली. यात मेट्रो रेल्वेच्या प्रस्तावावर चर्चा झाली. त्यांनाही ही कल्पना आवडली व लगेच मंजुरी दिली. 

नागपूर विदर्भातील प्रमुख बाजारपेठ आहे. येथे दररोज भंडारा, वर्धा तसेच रामटेक, नरखेड, काटोल तालुक्‍यातील शेकडो व्यापारी, नोकरदार, नागरिक व्यावसाय व कामानिमित्त येतात. बसशिवाय दुसरा पर्याय नसल्याने प्रवासात त्यांचा बराच वेळ जातो. वर्धा जिल्हा नागपूरपासून 80 किलोमीटर अंतरावर आहे. भंडारा जिल्हा शंभर किलोमीटर, काटोल नरखेड तालुकेही जवळपास इतक्‍याच अंतरावर आहेत. बसने पोहोचायला दीड ते दोन तास लागलात. यामुळे अनेकांची गैरसोय होतात. पैसेही जास्त लागतात. हेच अंतर लोकल ट्रेन सुरू झाल्यास अर्धा तासात कापता येणार आहे. 

डब्यांची निर्मितीही होणार 
लोकल डब्यांच्या निर्मितीसाठी बुटीबोरी एमआयडीसीत शंभर एकर जागा देण्याची तयारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दर्शवली आहे. काही कंपन्यांशी त्यांनी चर्चाही केली आहे. त्यांची योजना यशस्वी झाल्यास डब्यांच्या निर्मितीचा कारखानाही नागपूरमध्ये येऊ शकतो. यामुळे मोठ्या प्रमाणात रोजागरही उपलब्ध होऊ शकतात. 

वैदर्भीयांचा प्रवास होणार सुपरफास्ट 
चार डब्यांची ही गाडी राहणार आहे. एका गाडीसाठी शंभर कोटी रुपयांचा खर्च आहे. प्रायोगिक तत्त्वावर चार गाड्या घेऊन लोकल सुरू केली जाणार आहे. रेल्वेच्याच यंत्रणेचा याकरिता वापर केला जाणार आहे. रिकाम्या वेळेत त्यावर लोकल धावणार आहे. या गाड्या जलद असल्याने वैदर्भीयांचा प्रवास सुपरफास्ट होणार आहे. 

लगतच्या तालुक्‍यांचाही विकास शक्‍य 
अर्ध्या तासात परतण्याची सोय झाल्यास नागपूरमध्ये स्थायिक होण्यापेक्षा अनेकजण आपापल्या जिल्ह्यात राहतील. भविष्यात यामुळे नागपुरातील वर्दळ कमी होईल. शेजारचे तालुकेही आर्थिकदृष्ट्या विकसित होऊन नागपूर खऱ्या अर्थाने मेट्रो सिटी होईल. 

Web Title: Inter-District Local Railway run from Nagpur