राज्यात सात हजार शिक्षक स्वगृही परतणार!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 एप्रिल 2018

एक वर्षापासून दुसऱ्या टप्प्यातील आंतर जिल्हा बदलीचे प्रस्ताव रखडले होते. प्रहार शिक्षक संघटनेच्या पाठपुराव्यानंतर ग्रामविकास मंत्रालयाने दुसऱ्या टप्प्याला हिरवी झेंडी दिली.

अकोला - आंतरजिल्हा बदलीकरिता पात्र असलेल्या शिक्षकांची ता. 30 एप्रिल पूर्वी बदली होणार असल्याचे ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव आसिम गुप्ता यांनी प्रहार शिक्षक संघटनेच्या बैठकीत जाहीर केले. या निर्णयामुळे राज्यातील स्वगृही परतणाऱ्या शिक्षकांना चांगलाच दिलासा मिळाला आहे.

एक वर्षापासून दुसऱ्या टप्प्यातील आंतर जिल्हा बदलीचे प्रस्ताव रखडले होते. प्रहार शिक्षक संघटनेच्या पाठपुराव्यानंतर ग्रामविकास मंत्रालयाने दुसऱ्या टप्प्याला हिरवी झेंडी दिली. याबाबत ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव आसिम गुप्ता यांनी ता. 16 एप्रिल ला मुंबई येथे मंत्रालयात बैठक घेतली. बैठकीमध्ये जिल्हा अंतर्गत आणि आंतरजिल्हा बदली बाबत चर्चा करण्यात आली. केवळ रोस्टर प्रमाणित असलेल्या जिल्ह्यात रिक्त पदांवर बदली आंतर जिल्हा बदली प्रक्रियेने करण्याचे मान्य केले असून, रोस्टर प्रमाणित नसणाऱ्या जिल्ह्यात साखळीने बदल्या केल्या जातील. ज्या जिल्ह्यातील रिक्त पदांची टक्केवारी 10 टक्के पेक्षा कमी असेल तेथील कार्यमुक्ती मे मध्ये होईल, असे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. या बैठकी प्रसंगी प्रहार शिक्षक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू व राज्याध्यक्ष महेश ठाकरे यांच्यासह राज्यातील संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

जिल्हाअंतर्गत बदलीमध्ये संधी - 
आंतर जिल्हा ऑफलाईन व ऑनलाईन बदलीने या पूर्वी स्वजिल्ह्यात आलेल्या संवर्ग 1 व 2 मधील सर्वच शिक्षकांना ता. 27 फेब्रुवारीच्या शासन आदेशात तरतुदीनुसार जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेत लवकरच फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल, असे ग्रामविकास सचिवांनी सांगितले. 

पंचवीस टक्के शिक्षकांना पसंतिक्रम मिळणे अशक्य -
जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रियेमध्ये प्रत्येक संवर्गाच्या शिक्षकांना 20 पसंतिक्रम देण्यात आले असले तरी अखेर प्रक्रियेच्या अंतिम टप्प्यात 25 टक्के शिक्षकांना त्यांच्या पसंतिक्रमांने शाळा देने शक्य होणार नसल्याचे याप्रसंगी सचिवांनी स्पष्ट केले .

शिक्षिकांची आंदोलने अशोभनीय -
बदली प्रक्रियेविरुद्ध अथवा शासन समर्थनार्थ शिक्षकांची आंदोलने गैर असल्याचे मत सचिवानी यावेळी व्यक्त केले. बदली हा अधिकार नसून, ती विनंती आहे. तेव्हा शिक्षकांनी हक्क समजून ती मागू अथवा नाकारू नये. ज्या शिक्षकांना बदली प्रक्रियेत शाळा मिळतील त्यांना त्याठिकाणी सेवा देने बंधनकारक असेल, असे ग्रामविकास सचिवांनी स्पष्ट केले.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: inter district teachers will be transferred before April 30