काटोल विधानसभा पोटनिवडणुकीला अंतरिम स्थगिती

काटोल विधानसभा पोटनिवडणुकीला अंतरिम स्थगिती

नागपूर : काटोल विधानसभा पोटनिवडणुकीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अंतरिम स्थगिती दिली असून, दोन एप्रिलला पुढील सुनावणी निश्‍चित केली आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर नामांकन अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया आपसूकच अनिश्‍चितकाळापर्यंत पुढे ढकलली गेली आहे.
आशीष देशमुख यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या काटोल विधानसभेच्या जागेसाठी 11 एप्रिलला निवडणूक जाहीर केली होती. निवडणुकीला काटोल पंचायत समितीचे अध्यक्ष संदीप सरोदे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून आव्हान दिले आहे. 26 मार्चपासून उमेदवारी अर्ज भरण्याची व 28 मार्चला दुपारी तीनपर्यंत अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया घोषित केली होती. त्यामुळे न्यायालयाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
मंगळवारी झालेल्या सुनावणीत निवडणूक अधिसूचना काढताना खर्चासह इतर सर्व बाबींचा विचार केला होता का, असा सवाल न्यायालयाने आयोगाला केला. न्यायालयाने तसेच याचिकाकर्त्याने उपस्थित केलेल्या प्रश्‍नांवर उत्तर दाखल करण्यासाठी निवडणूक आयोगाने दोन आठवड्यांचा कालावधी मागितला आहे. न्यायालयाने आयोगाला दोन आठवड्यांचा वेळ दिला; पण तोपर्यंत निवडणूक प्रक्रियेला अंतरिम स्थगितीही दिली. याचिकाकर्त्यांच्या वतीने ऍड. श्रीरंग भांडारकर यांनी बाजू मांडली.
खर्च टाळण्याची विनंती
15 ऑक्‍टोबर 2014 ला काटोल विधानसभेसाठी निवडणूक झाली. यात आशीष देशमुख विजयी झाले. चार वर्षांनी तीन ऑक्‍टोबर 2018 ला त्यांनी पदाचा राजीनामा दिला. निवडणूक आयोगाने या जागेसाठी 11 एप्रिलला मतदान घोषित केले. 23 मे रोजी निकाल लागेल आणि जूनमधील पावसाळी अधिवेशनात विजयी आमदार शपथ घेईल. त्यानंतर ऑक्‍टोबरमध्ये महाराष्ट्रात पुन्हा विधानसभा निवडणुका लागतील. यामुळे अवघ्या सहा महिन्यांच्या आत दोन निवडणुका होतील. हे लोकप्रतिनिधित्व कायद्याचे उल्लंघन असेल, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. या निवडणुकीमध्ये प्रत्येक गोष्टीवर अकारण खर्च होईल. दुसरीकडे काटोलला कोरडा दुष्काळ जाहीर केला आहे. त्यामुळे पोटनिवडणुकीवरील खर्च टाळावा, अशी विनंती याचिकाकर्त्याने केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com