मेडिकलच्या आवारात इंटर्नसला लुटले

मेडिकलच्या आवारात इंटर्नसला लुटले
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) एका आंतरवासिता अर्थात इंटर्नस्‌ला मेडिकलच्या आवारात मध्यरात्री दीडच्या सुमारास चार अज्ञात आरोपींनी ब्लेडचा चिरा मारून लुटल्याची घटना घडली. मेडिकल प्रशासनाने हे प्रकरण बाहेर येऊ नये याची काळजी घेत दाबण्याचा प्रयत्न केला, मात्र गुरुवारी मार्ड संघटनेतर्फे आंदोलनाचा इशारा देण्यात आल्यामुळे हे प्रकरण उजेडात आले.
लाखो रुपये खर्चून डॉक्‍टरांच्या सुरक्षेसाठी "सीसीटीव्ही कॅमेरे' लावले. सुरक्षारक्षक लावण्यात आले. मात्र सीसीटीव्ही अर्धेअधिक बंद आहेत. मंगळवारी मध्यरात्री दीड वाजता इंटर्नस्‌ प्रेम (बदललेले नाव) वसतिगृह क्रमांक 3 मध्ये जात असताना अचानक शासकीय दंत रुग्णालयाजवळ त्याला थांबवण्यात आले. अनोळखी व्यक्तीने एक जखमी व्यक्ती पेइंग वॉर्डाशेजारी पडला असून त्याला मदत करण्याची विनंती केली. प्रेमने दुचाकीवर त्या व्यक्तीला बसवले आणि त्या स्थळावर आला. येथे आधीच दबा तीन जण दबा धरून बसले होते. अशाप्रकारे चौघांनी प्रेमला जबरदस्तीने नवीन औषधालय भांडार परिसरात नेले. इंटर्न्स प्रेमने प्रतिकार केला, ओरडला परंतु ते व्यर्थ ठरले. इंटर्न्सच्या हातावर ब्लेडने वार करण्यात आल्यामुळे तो पुन्हा गप्प झाला. धारदार शस्त्राने ठार मारण्याची धमकी दिली गेली. त्याच्या खिशातील तीन हजार रुपये काढले. अर्धा तास शस्त्राच्या बळावर येथेच बसवून ठेवण्यात आले. आजूबाजूला कोणी नसल्याची खात्री करून घेतल्यानंतर सर्व आरोपी तेथून दोन दुचाकीवर पसार झाले.
घाबरलेला इंटर्न्स पुन्हा रुग्णालयात
रुग्णांची सेवा करणारा हा इंटर्न्स जखमी अवस्थेत स्वतःवरील उपचारासाठी घाबरलेल्या अवस्थेत अपघात विभागात पोहचला. त्याला बघताच डॉक्‍टरांनी विचारपूस केली. परंतु मलमपट्टी करून त्याने थेट वसतिगृह गाठले. ही माहिती इतर विद्यार्थ्यांना मिळताच खळबळ उडाली. दुसऱ्या दिवशी वैद्यकीय अधीक्षक कार्यालय गाठले. ही माहिती दिली. सीसीटीव्ही कॅमेरे बघितले. अजनी पोलिसांना सूचना मिळाल्यावर तेही पोहचले. सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने आरोपी यात दिसला नाही. पोलिसांनी विद्यार्थ्याला तक्रार करण्याचा सल्ला दिला. त्याने नकार दिला. अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला. मार्डच्या प्रतिनिधींनी गुरुवारी अधिष्ठात्यांची भेट घेतली. सुरक्षा न वाढवल्यास आंदोलनाचा इशारा दिला, यामुळे हा प्रकार उजेडात आला. घाबरलेला इंटर्न्स कालपासून बाहेर निघाला नाही. तो मानसिक धक्‍क्‍यात आहे. त्याचे समुपदेशन करण्याची गरज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com