मुलींची विक्री करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 एप्रिल 2018

नागपूर - मुलींचे अपहरण करुन त्यांना परप्रांतात विकणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला पकडण्यात अजनी पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका महिलेसह तिघांना ताब्यात घेतले आहे. त्यांना चौदा दिवसांच्या पोलिस कोठडीत पाठविण्यात आले आहे. 

नागपूर - मुलींचे अपहरण करुन त्यांना परप्रांतात विकणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला पकडण्यात अजनी पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका महिलेसह तिघांना ताब्यात घेतले आहे. त्यांना चौदा दिवसांच्या पोलिस कोठडीत पाठविण्यात आले आहे. 

अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून नोव्हेंबर महिन्यात 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. तिचा शोध घेण्यासाठी अजनी पोलिसांनी तपास करण्यास सुरुवात केली. तपासात लता हरिदास तिजारे (वय 40, रा. बेलतरोडी) या महिलेने आपल्या साथीदाराच्या मदतीने मुलीची मध्यप्रदेशात विक्री केल्याची माहिती समोर आली. याप्रकरणी लता तिजारे या महिलेला ताब्यात घेऊन विचारणा केली असता, तिने श्‍वेता शैलेंद्र शेंडे (वय 20, रा. बाबुळखेडा), राज भल्ला उर्फ राज गणवीर (वय 32, रा. रामटेकेनगर), रितेश गवई ऊर्फ गवई काल्या (वय 35, रा. मित्रनगर) यांच्या मदतीने मध्यप्रदेशातील राजगढ जिल्ह्याच्या जिरापूर तालुक्‍यात देवसिंग फुलसिंग गुर्जर (वय 40, रा. कालियाखेडी) याला सव्वा लाखात विक्री केल्याचे उघडकीस आले. 

पोलिसांनी त्याच्या घरी जाऊन शोध घेतला असता, तो फरार असल्याचे आढळून आले. मात्र, तपासात देवीसिंगने मुलीची विक्री सागर भैरुसिंग गुर्जर (वय 32, रा. डाबली, लक्ष्मीपूर, राजगढ) याला केल्याचे समजले. पोलिसांनी सागरच्या घरी छापा टाकून त्याला ताब्यात घेत, मुलीची सुटका केली. सागरने देवीसिंगकडून दीड लाख घेऊन मुलीची खरेदी केल्याचे तपासात निष्पन्न झाले. मुलगी ताब्यात असताना, स्वत: सागर आणि त्याचा मोठा भाऊ नारायण याने पीडित मुलीवर अत्याचार केल्याचीही माहिती समोर आली. पोलिसांनी लता तिजारे, सागर गुर्जर यांना पोलिसांनी अटक केली आहे. 

मध्यवर्ती कारागृहात असलेल्या गवई काल्या यास "प्रोडक्‍शन वॉरंट'द्वारे ताब्यात घेत, प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यासमोर सादर करण्यात आले. तिघांचीही 4 मे पर्यंत पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली. या प्रकरणात पोलिस उपायुक्त नीलेश भरणे यांनी उपनिरीक्षक वाय.व्ही. इंगळे यांच्या नेतृत्वात पाठविलेल्या पथकाने ही कामगिरी यशस्वीरित्या राबवून आंतरराज्यीय टोळी उघडकीस आणली. 

आणखी मुलींची विक्री केल्याचा संशय 
गेल्या काही वर्षांपासून ही टोळी शहरात कार्यरत असून त्यांच्या माध्यमातून अनेक मुलींची विक्री केल्याचा पोलिसांना संशय आहे. टोळीतील इतर साथीदार अद्याप फरार आहे. ते सापडताच, बरीच माहिती पोलिसांच्या हातात लागण्याची शक्‍यता आहे. केवळ मध्यप्रदेशच नव्हे तर इतर राज्यातही मुलींची विक्री केल्याचा कयास असून त्या दिशेने पोलिस यंत्रणा काम करीत आहे.

Web Title: Interstate gang of girl child exposed