कार चोरीची आंतरराज्यीय टोळी जाळ्यात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 सप्टेंबर 2019

नागपूर: राज्यभरातून कोणतेही वाहन चोरल्यानंतर 24 तासांच्या आत वाहनांचा कायापालट करून समांतर आरटीओ कार्यालयातून बनावट कागदपत्रे आणि चेचीस क्रमांक टाकून अन्य ग्राहकांना वाहन विक्री करणारी आंतरराज्यस्तरीय चोरट्यांची टोळी गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकली. या टोळीतील सहा जणांना अटक करण्यात आली आहे. नागपुरातून 13 वाहने चोरी केली आहेत.

नागपूर: राज्यभरातून कोणतेही वाहन चोरल्यानंतर 24 तासांच्या आत वाहनांचा कायापालट करून समांतर आरटीओ कार्यालयातून बनावट कागदपत्रे आणि चेचीस क्रमांक टाकून अन्य ग्राहकांना वाहन विक्री करणारी आंतरराज्यस्तरीय चोरट्यांची टोळी गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकली. या टोळीतील सहा जणांना अटक करण्यात आली आहे. नागपुरातून 13 वाहने चोरी केली आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस चोरीच्या गुन्ह्याचा तपास करीत असताना त्यांनी आरोपी इमरानखान इस्माईल खान (38, रा. अमरावती), विनोद शंकरराव गिऱ्हे (40, रा. शैलू वेताळ ता. मूर्तिजापूर, जि. अकोला, ह. मु खोलापुरी गेट, अमरावती) या दोघांना अटक केली. दरम्यान, त्यांची विचारपूस सुरू असताना आरोपी इमरान खानने पोलिसांना उदय मारुती पाटील (रा. सुळे, कोल्हापूर), फरमान खान (रा. उत्तर प्रदेश) आणि दोन अज्ञात युवक (रा. उत्तर प्रदेश) यांनी मिळून नागपूर शहरातून जवळपास 13 चारचाकी वाहने चोरून नेल्याची माहिती दिली. या चोरीच्या वाहनांपैकी काही वाहने मुंबई व सोलापूर येथे नेण्यासाठी आरोपींनी इमरान खान या चालकाची मदत घेतल्याची माहिती समोर आली. आरोपींनी या वाहनांपैकी काही वाहने मुंबई, सोलापूर व औरंगाबाद येथे नेऊन बनावट कागदपत्र बनवून विकल्याची माहिती उघडकीस आली. या प्रकरणातील सहाही आरोपींना ताब्यात घेऊन पोलिसांनी सोलापूर येथून तपास करण्याच्या उद्देशाने नागपुरात आणले आहे. या रॅकेटमध्ये आणखी काही आरोपी सहभागी असल्याचा पोलिसांना संशय असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. या सहाही आरोपींच्या चौकशीदरम्यान नागपूर शहर व इतर ठिकाणी चोरीला गेलेल्या चारचाकी वाहनांचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्‍यता पोलिसांनी वर्तविली आहे.
चार कार जप्त
पोलिसांनी आरोपींकडून स्वीफ्ट कार (5 लाख रुपये), मारुती अर्टिगा (9 लाख रुपये), मारुती स्वीफ्ट डिझायर (7 लाख रुपये), टोयोटा फॉरच्युनर (25 लाख रुपये) या सर्व वाहनांवर बनावट वाहन नंबर, चेसिस नंबर, इंजिन नंबर असून पोलिसांनी एकूण 46 लाखांची वाहने जप्त केली आहेत. ही कारवाई अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) नीलेश भरणे, पोलिस उपायुक्त (डिटेक्‍शन) गजानन राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक खंदाळे, पोलिस शिपाई नरेंद्र ठाकूर, प्रवीण रोडे, सागर ठाकरे, कुणाल मसराम, सुहास शिंगणे, सूरज भोंगाळे, आशीष पाटील यांनी पार पाडली.
समांतर आरटीओ कार्यालय
गुन्हे शाखेच्या चमूने मुंबई तसेच सोलापूर येथे जाऊन तपास केला असता मुंबई येथील आरोपी जैनुद्रदीन शहा, जलालुद्रदीन शाह (दोघे रा. घाटकोपर मुंबई) यांनी समांतर आरटीओ कार्यालय स्थापन केले होते. चोरलेल्या वाहनांवर स्क्रॅप व टोटल लॉसमधील वाहनांचे इंजिन नंबर, चेसिस नंबर पंचिंगचे काम करून आर.टी.ओ. पेपर बनविण्याचे काम करीत असल्याचे निदर्शनास आले. चोरी केलेले वाहने पेपरसह विकण्याचे काम आरोपी अतिक शुकुर (रा. मुमताजनगर, सोलापूर) तसेच उदय पाटील हे दोघे करीत होते.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Interstate gangs of car thefts burned