100 इलेक्‍ट्रिक बससाठी गुंतवणूक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 सप्टेंबर 2019

नागपूर : शहरात पाच महिला विशेष इलेक्‍ट्रिक बसचे लोकार्पण झाले. आणखी 100 इलेक्‍ट्रिक बससाठी नागपुरात गुंतवणूक करण्याची तयारी आहे. इलेक्‍ट्रिक बस तयार करणारी ओलेक्‍ट्रा-बीवायडी ही पहिली कंपनी असून आतापर्यंत हिमाचल प्रदेश, मुंबई, हैदराबाद, केरळ, पुणे शहरात या बसेस सुरू करण्यात आल्या आहे. यात आता नागपूरचीही भर पडली. महिलांसाठी विशेष इलेक्‍ट्रिक बस असलेले नागपूर पहिले शहर ठरल्याचे ओलेक्‍ट्रा कंपनीचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर आनंद स्वरूप यांनी नमूद केले.
इलेक्‍ट्रिक बस लोकार्पणानिमित्त नागपुरात आले असता वर्धा मार्गावरील खासगी हॉटेलमध्ये ते निवडक पत्रकारांसोबत बोलत होते. ओलेक्‍ट्रा कंपनीने इलेक्‍ट्रिक बस तयार करणाऱ्या जगातील मोठ्या "बीवायडी' कंपनीसोबत तांत्रिक करार केल्याचे नमुद करीत ते म्हणाले, या तंत्रज्ञानासह हैदराबाद येथे इलेक्‍ट्रिक बसनिर्मितीचा प्रकल्प सुरू आहे. सध्या वर्षाला दोन हजार बस तयार करण्यात येत आहे. भविष्यात कंपनीचा विस्तार करण्यात येत असून सहा हजार बसनिर्मितीचे लक्ष्य असल्याचे ते म्हणाले. कंपनी चार प्रकारच्या बस तयारी करीत आहे. यात सात मीटर लांबीची 11 ते 23 आसनी, 9 मीटर लांबीची चालकासह 32 आसनी, 12 मीटर लांबीची 34 आसनी बस असून सुरक्षेच्या दृष्टीने सर्वसोयीयुक्त असलेल्या बसचा समावेश आहे. 12 मीटर बसमध्ये दिव्यांगांना चढण्यासाठी रॅम्पही तयार करण्यात आल्याचे स्वरूप म्हणाले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Investment for 100 electric buses