निमंत्रणावरून आमदार-पालकमंत्र्यात शाब्दिक चकमक

योगेश फरपट । सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 डिसेंबर 2016

जीमच्या उद्‌घाटन कार्यक्रमात भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

अकोला : अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर आणि जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्यात रविवारी निमंत्रणाच्या कारणावरून चांगलीच शाब्दिक चकमक उडाली. सरकार विदर्भात असताना सत्ताधारी भाजपमधील या सुंदोपसुंदीने अकोल्यातील राजकीय वातावरण थंडीतही चांगलेच तापले.

जीमच्या उद्‌घाटन कार्यक्रमात भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

अकोला : अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर आणि जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्यात रविवारी निमंत्रणाच्या कारणावरून चांगलीच शाब्दिक चकमक उडाली. सरकार विदर्भात असताना सत्ताधारी भाजपमधील या सुंदोपसुंदीने अकोल्यातील राजकीय वातावरण थंडीतही चांगलेच तापले.

जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या वतीने रविवारी (ता.4) आयोजित "कॅफेटेरिया मल्टीजीम व ओपन जीम''च्या उद्‌घाटन कार्यक्रमादरम्यान ही शाब्दिक चकमक झाली. दरम्यान, आजच्या कार्यक्रमाचं निमंत्रण वेळेवर दिल्याचा आरोप आमदार रणधीर सावरकर यांनी केला, तर पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी प्रोटोकॉल पाळल्याचं सांगतानाच सावरकर यांना राजकारण न करण्याचा टोला लगावला आहे.

जिल्ह्यात भाजप खासदार संजय धोत्रे गट व पालकमंत्री डॉ. रणजित पाटील गट यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. रविवारी या वादाने कळस गाठला. जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या वतीने शनिवारी कॅफेटेरिया मल्टीजीम व ओपन जीमच्या उद्‌घाटनाचा कार्यक्रम सकाळी 9.30 वाजता आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी जिल्हा प्रशासनातर्फे शनिवारी संध्याकाळी सर्व लोकप्रतिनिधींना निमंत्रणे देण्यात आली होती. मात्र, या कार्यक्रमाचे निमंत्रण वेळेवर मिळाल्याचा आरोप करतानाच खासदार व पक्षाचे अन्य एक आमदार शहरात नसल्याने कार्यक्रम कसा काय होत आहे, अशा शब्दात आमदार रणधीर सावरकरांनी जिल्हा प्रशासनाला फटकारले. पालकमंत्र्यांशीही ते उद्धटच बोलले. मध्यस्थी करणाऱ्या अधिकाऱ्यांनाही त्यांनी फटकारले. उद्‌घाटन कार्यक्रमातील या वादाने अधिकाऱ्यांची चांगलीच गोची झाली.

दोन गट कायम एकमेकांवर राजकीय कुरघोडीची एकही संधी सोडत नाहीत. या दोन्ही गटातील संघर्ष आज पुन्हा चव्हाट्यावर आला. विशेष म्हणजे, हा सर्व वाद सुरू असताना पालकमंत्र्यांसह इतर पदाधिकारी बसलेले होते तर आमदार रणधीर सावरकर अखेरपर्यंत उभेच राहले. या वेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्याताई वाघोडे, महापौर उज्ज्वला देशमुख, आमदार गोपीकिशन बाजोरिया, आमदार बळीराम सिरस्कार, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, आंतरराष्ट्रीय कॅरम फेडरेशनचे कोषाध्यक्ष प्रभजीतसिंह बच्छेर, कृषी विद्यापीठ विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक संजय कोकाटे उपस्थित होते.

शासकीय कार्यक्रमासाठी महिनाभरापासून जिल्हा प्रशासनातर्फे तारीख मागितली जात होती. लवकरच महापालिकेची आचारसंहिता लागणार आहे. सोमवारपासून अधिवेशन सुरू होत आहे. त्यामुळे उद्‌घाटन लवकर व्हावे, असे इच्छा अधिकाऱ्यांनी व्यक्त केली होती. पुढे येणाऱ्या अडचणी लक्षात घेता रविवारचा दिवस देण्यात आला होता. एखादा कार्यक्रम जर प्रोटोकॉलनुसार झाला नसेल तर लोकशाही मार्गाने आपले मत मांडण्यासाठी अनेक मार्ग उपलब्ध आहेत. त्यासाठी सार्वजनिक ठिकाणी येऊन वाद घालने योग्य नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार प्रोटोकॉल पाळला गेला नसेल तर हक्कभंग आणू शकतात.
- डॉ. रणजित पाटील, पालकमंत्री अकोला तथा गृहराज्यमंत्री.

अकोला पूर्व मतदारसंघात कार्यक्रम होत असताना आमदार गोवर्धन शर्मा यांची उपस्थिती प्रार्थनीय आहे. खासदार संजय धोत्रे यांच्या अनुपस्थितीत कार्यक्रम घेणे बरोबर नाही. त्यांच्या अनुपस्थित कार्यक्रम घेणे म्हणजे विकासाचे श्रेय लाटण्याचा हा प्रकार आहे. काल रात्री फोन करून आज एवढ्या घाईत कार्यक्रम घेण्याचा पालकमंत्र्यांचा अट्टाहास कशासाठी?
- रणधीर सावरकर, आमदार (अकोला पूर्व)

मी तीन दिवसांपासून छत्तीसगड येथे आहे. मला जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांचा काल फोन आला होता. मात्र कार्यक्रम चार-पाच दिवसानंतर ठेवल्यास बरे होईल, असे सांगितले. कार्यक्रमाला खासदार संजय धोत्रे उपस्थित राहिल्यास उचित होईल, असेही म्हणालो. पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्याशीही बोलणे झाले. त्यांनाही हेच सांगितले. मात्र ते कार्यक्रम घेणे आवश्‍यक असल्याचे म्हणाले. यावर मी त्यांना ठिक आहे, असे म्हणत होकार दिला.
- गोवर्धन शर्मा, आमदार.

Web Title: Invitation of the legislator-palakamantri skirmish