पेनटाकळीच्या निकृष्ट कालव्यांमुळे शेकडो हेक्टर शेतीची झाली ‘दलदल’; पाटबंधारे विभाग १८ वर्षांपासून झोपलेलाच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पेनटाकळीच्या निकृष्ट कालव्यांमुळे शेकडो हेक्टर शेतीची झाली ‘दलदल’; पाटबंधारे विभाग १८ वर्षांपासून झोपलेलाच

पेनटाकळीच्या निकृष्ट कालव्यांमुळे शेकडो हेक्टर शेतीची झाली ‘दलदल’; पाटबंधारे विभाग १८ वर्षांपासून झोपलेलाच

पेनटाकळी प्रकल्प उभारला. तो पूर्ण झाला... आणि जणू उपकार केल्याची अहम् भावना सिंचन, पाटबंधारे आदी सरकारी विभागांची झाली. प्रकल्पामुळे आता मेहकर तालुक्यात समृद्धी नांदेल असे वाटायला लागले. परंतु ‘सुख पाहता जवापाडे, दुःख पर्वताएवढे’ अशी गत झाली. खाबुगिरीच्या भ्रष्टाचारी भुंग्यांनी अख्खा प्रकल्प पोखरून टाकला. कालव्यांचे पोट फाटले. कालव्यातून पाणी शेतात पाझरू लागले. शेतीत दलदल झाली. आता ना खरिपाची शेती पिकत, ना रब्बीची. अतिपाण्यामुळे पिके सडू लागली. शेती खरडून निघू लागली. पेनटाकळी, दुधा, ब्रह्मपुरी, रायपूर, भालेगाव अशा अनेक गावांतील शेकडो शेतकऱ्यांना तर शेती सोडावी लागली. शेतीत तुडुंब पाणी आणि वैराण जिंदगी, अशी स्थिती झाली. मेहकर तालुक्याचे नाव मराठी साहित्यात अजरामर करणारे सुप्रसिद्ध कवी दिवंगत ना. घ. देशपांडे त्यांच्या कवितेत म्हणतात-

दूर सोनेरी सुखाचे पाहिले आभास मी, तू

रंगले आभाळ पूर्वी, तेच आता फाटले

असेच महादुःख शेकडो शेतकऱ्यांच्या वाट्याला आले. शेकडो वेळा सरकारी विभागांना तक्रारी केल्या, निवेदने दिली. ‘एक तर कालवे दुरुस्त करा किंवा मोठी पाईपलाईन उभारून पाणी सोडा,’ अशी आर्जवे केली. परंतु सरकारी विभाग एक, दोन वर्षांपासून नव्हे तर तब्बल १८ वर्षांपासून झोपेचे सोंग घेऊन आहे. सरकारी विभागांतील या सोंगाटांना जागविण्याची वेळ आता आली आहे.

बुलडाण्याहून निघून उन्ह व्हायच्या आत मेहकर तालुका गाठला. कामगार दिन, मराहाष्ट्र दिन असतानाही कुठे सेलिब्रेशन नव्हते. बसस्थानकावर ‘सकाळ’चे मेहकर तालुका बातमीदार विनोद झालटे यांनी ‘रिसिव्ह’ केले. त्यांच्यासोबत हेमाडपंथी बालाजीच्या मंदिरात भेट दिली. येथील १० फूट उंच मूर्ती १९८८ मध्ये मातीच्या ढिगाऱ्याखाली सापडली होती. ‘सिंचनाच्या दृष्टीने परिपूर्ण असलेल्या या तालुक्यातील शेतकरी सधन असतील’, अशी विचारणा करताच स्मितहास्य करीत विनोदरांवानी दीर्घ उसासा घेतला. ‘‘पाण्याच्या अतिरेकामुळे आणि पाटबंधारे विभागाच्या नाकर्त्या नियोजनामुळे पिकांची कशी नासाडी होते, हेच तुम्हाला दाखवतो बाबू अच्छेलाल’’, असे ते म्हणाले आणि आमची गाडी थेट निघाली पेनटाकळी प्रकल्पाकडे.

पेनटाकळी प्रकल्पाच्या एक ते दीड किलोमीटरदरम्यान पेनटाकळी, दुधा, ब्रह्मपुरी, रायपूर ते भालेगावपर्यंतच्या शिवारातील कालवा पाझरत आणि फुटत असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. हा कालवा दुरुस्तीसाठी या परिसरातील शेतकरी दरवर्षी आंदोलन करतात. मात्र, त्यांच्या नशिबी अपयश आले. तालुक्यातील पेनटाकळी प्रकल्प ३० वर्षांपूर्वी तयार झाला. प्रकल्पाच्या कालव्यामुळे दुधा, ब्रह्मपुरी, रायपूर, पाचला, बारही आदी गावांतील शेतकऱ्यांना शेतीसाठी उपयोग होत होता. परंतु, प्रकल्पाची देखभाल दुरुस्ती होत नसल्याने २००३ पासून या भागातील शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. दिवसेंदिवस शेतीची उत्पादकता कमी होत आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी खारपाणपट्ट्यासारख्या झाल्या आहेत. यामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. यास सर्वस्वी पाटबंधारे विभाग जबाबदार असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.

जमीन जाते खरडून

गेल्या अनेक वर्षांपासून कालव्याची देखभाल होत नसल्याने कालव्याच्या परिसरात असलेल्या बाभळी, निंब यासह अनेक मोठमोठ्या झाडांमुळे कालव्याच्या अस्तरीकरणाला तडे गेले आहेत. बऱ्याच ठिकाणी कालव्याला तडे गेल्याने कालवा फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या वर्षी कालवा फुटल्याने पेनटाकळी-दुधा शिवेवरील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. याशिवाय स्प्रिंकलर पाइपाचे नुकसान झाले होते. यामुळे शेतकऱ्यांची जमीन खरडून गेली होती. त्या शेतकऱ्यांना पाटबंधारे विभागाकडून अद्यापपर्यंत कुठलीही भरपाई मिळालेली नाही. कालवा पाझरत असल्याने पेनटाकळी प्रकल्प तुडुंब भरला की या भागातील शेतकऱ्यांच्या उरात धडकी भरते.

कालव्यात वाढल्या बाभळी

कित्येक वर्षांपासून कालव्याची देखभाल, दुरुस्ती होत नसल्याने कालव्यात बाभळी, निंब यांसह मोठमोठी झाडेझुडपे वाढलेली आहेत. या झाडांमुळे कालव्याच्या अस्तरीकरणाला तडे गेले आहेत. अजूनही अनेक ठिकाणी तडे गेलेले असल्याने भविष्यात कालवा इतर ठिकाणी फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाटबंधारे विभागाच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांचे अधिक नुकसान होते. त्यामुळे पाटबंधारे विभागाबद्दल स्थानिकांमध्ये रोष आहे.

या शेतकऱ्यांसाठी फायद्याचे

० ते ११ किलोमीटरच्या पुढील शेतकऱ्यांना कालव्याचा लाभ मिळतो. तालुक्यातील पेनटाकळी प्रकल्प सुरू झाल्यापासून ० ते ११ किलोमीटरच्या परिसरातील शेतकऱ्यांचे पाटबंधारे विभागाच्या हलगर्जीपणामुळे नुकसान होते. तर यापुढील गावांना रब्बी हंगामासाठी कालव्याचा फायदाच होतो. त्यात सावत्रा, जानेफळ, मोसमबे वाडी, निंबा, मिस्किन वाडी, लोणी, गोमेधार, उटी, घुटी, वरवंड, घाटनाद्रा, बोथा यासह परिसरातील गावांना रब्बी हंगामात फायदा झाला.

परशराम, गजानन, प्रभाकर अवचार यांची झोपच उडाली. पेनटाकळी प्रकल्पाच्या कालव्यामुळे दरवर्षी अनेक शेतकऱ्यांचे नुकसान होते. प्रकल्पाच्या १ ते ५ किलोमीटरदरम्यानचा पेनटाकळी दुधा शिवाराच्या शिवेनजीकचा कालवा १५ डिसेंबर २०२० रोजी रात्रीच्या वेळी फुटल्याने पेन टाकळी शिवारातील गट नं ६५ मधील आत्माराम परशराम अवचार, गजानन परशराम अवचार व प्रभाकर महादू अवचार यांची आठ एकर फळबागांची शेतजमीन खरडून गेली. जमिनीच्या आतील मुरुम आणि दगड उघडे पडले. याच शेतातील कुंपण, स्प्रिंकलर सेट, हरभरा, ऊस, ठिंबक सिंचन वाहून गेले होते. दोन वर्षांपूर्वी महापूर व अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले असताना पाटबंधारे विभागाच्या हलगर्जीपणामुळे तिन्ही शेतकरी उद्ध्वस्तच झाले. शेतालगतच पेनटाकळी प्रकल्प असल्यामुळे आपण सर्वात सधन, चांगले पीक घेणार कास्तकार असा बडेजाव परिसरातील शेतकऱ्यांमध्ये होता. परंतु कालव्याच्या निकृष्ट कामामुळे त्यांच्या आयुष्याचाच चिखल झाला. खरिपाची शेती तर होत नाहीच; त्यात भरीस भर म्हणजे रब्बीच्या हंगामातही सततच्या पाझऱ्यामुळे पिके पिवळी पडून उत्पादनात घट होतो.

शेतकरी मागताहेत इच्छा मरणाची परवानगी

पोटच्या लेकरागत वाढवलेले पीक डोळ्यांसमोर पिवळे पडून नष्ट होत असल्याचे आम्ही दरवर्षीच पाहतो. प्रकल्प तुडुंब भरला की त्याचे पाणी सोडले जाते. त्यामुळे आमचे शेत पुराच्या पाण्यात असते. खरिपाचे पीक गेल्याने रब्बी पिकांकडून आशा असते. पावसाळ्यात पुरामुळे झालेले नुकसान रब्बीत भरून निघेल, असे वाटत असतानाच कालव्यातून पाणी सोडल्याने पाणी शेतात पाझरते. ज्यामुळे पिकांचे प्रचंड नुकसान होते. सततच्या नुकसानीमुळे आम्ही त्रस्त आहोत. एक तर आमची ही समस्या दूर करा किंवा इच्छा मरणाची तरी शासनाने आम्हाला परवानगी द्यावी, अशी आर्जवी मागणी अत्यंत दुःखद अंतःकरणारने दुथा येथी शेतकरी एकनाथ सास्ते यांनी केली. त्यांच्यासह अनेक शेतकरी अशीच मागणी करताहेत.

संपादन - अथर्व महांकाळ

Web Title: Irrigation Department Ignoring Cannel In

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :vidarbha
go to top