isapur
isapur

चला पर्यटनाला! इसापूर वन्यजीव अभयारण्यात विविध पशु-पक्षी आणि विपुल वृक्षराजी

पुसद (जि. यवतमाळ) : मानव-वन्यजीव संघर्षाच्या बातम्या अलिकडे नेहमीच्याच झाल्या आहेत. कारण मानवाने वन्यप्राण्यांच्या अधिवासावर जंगल-वनांवर अतिक्रमण केले आहे. मानवाच्या या अतिक्रमणाला आळा बसावा, म्हणून अलिकडे विशेष प्रयत्न केले जात आहेत. त्याच प्रयत्नांचा एक भाग म्हणजे यवतमाळ जिल्ह्यातील पुसद व मराठवाड्यातील हिंगोली तालुक्‍यातील एकूण 2 हजार 900 हेक्‍टर वन क्षेत्रावर इसापूर वन्यजीव अभयारण्य निर्मितीची प्रक्रिया सुरू आहे. या अभयारण्यातील अतिसंवेदनशील क्षेत्र घोषित करण्यासाठी पुसद तालुक्‍यातील अभयारण्याशी निगडीत गावांमध्ये जनसंवाद कार्यक्रम राबविण्यात येत आहे, याद्वारे रहिवाशांचे प्रश्न समजून घेण्यात येतील, अशी माहिती पुसद वनविभागाचे उपवनसंरक्षक अरविंद मुंढे यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली.

इसापूर अभयारण्य वन्यजीव अभयारण्याची निर्मिती केंद्र सरकारच्या वनहक्क कायद्यानुसार 2014 मध्ये करण्यात आलेली आहे. विदर्भाच्या सीमारेषेवरील पैनगंगा नदीवर इसापूर येथे मोठे धरण असून पुसद तालुक्‍यातील 2 हजार 500 हेक्‍टर क्षेत्रावर तर हिंगोली तालुक्‍यातील 400 हेक्‍टर अशा एकूण 2 हजार 900 हेक्‍टर क्षेत्रात जलाशयाच्या भोवती जंगल पसरले आहे. यात बिबट, अस्वल, हरीण, नीलगाय, रानडुक्कर, रानकुत्रे, तरस, मोर व विविध प्रकारच्या पक्ष्यांचा अधिवास आहे. सुरुवातीला हे केवळ पक्षी अभयारण्य असणार होते. मात्र वन्यजीवांचा मोठ्या प्रमाणावर वावर असल्याने त्यांच्या संरक्षणासाठी वन्यजीव अभयारण्याची निर्मिती करण्यात आलेली आहे. या अभयारण्याच्या अधिवास निर्मितीसाठी समिती गठित करण्यात आली असल्याचे उपवनसंरक्षक अरविंद मुंढे यांनी संगितले.

या वन्यजीव अभयारण्य वनक्षेत्रात पाटबंधारे विभागाची 800 हेक्‍टर जमीन तर खाजगी 300 एकर जमीन असून ही जमीन अधिग्रहित करण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांच्या स्तरावर प्रक्रिया सुरू आहे. ही जमिन अधिग्रहित झाल्यास वन्यजीव अभयारण्याचे क्षेत्र वाढणार आहे. या अभयारण्यातील 20-30 हेक्‍टर मध्यगाभा क्षेत्रात कुठलेही गाव नाही, त्यामुळे अभयारण्य निर्मितीच्या प्रक्रियेत कुठलाही अडथळा नाही. तरीपण आजूबाजूच्या नानंद, जाम नाईक, अनसिंग, गौळमांजरी, गोपवाडी, सातेफळ, बुटी या गावातील रहिवाशांचे मनोगत व प्रश्न जाणून घेण्यात येतील. त्यासाठी येत्या ता.21 जुलै व 22 जुलै रोजी जनसंवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यात वैयक्तिक सामूहिक व इतर हक्कांमध्ये किंवा पुनर्वसाहत संबंधी लोकांशी चर्चा करण्यात येईल, असे मुंढे म्हणाले.
अभयारण्य अधिवास निर्माण समितीचे गठण करण्यात आले असून समितीचे अध्यक्ष मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक तथा अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम. एस. रेड्डी तर सचिव म्हणून उपवनसंरक्षक अरविंद मुंढे काम पाहत आहेत. या समितीत एकात्मिक विकास प्रकल्प पुसदच्या प्रकल्प अधिकारी श्रीमती जी. पी. निकम, डॉ. रमजान विराणी, कु. टी. एस. हनवते, कौशल्या कांबळे डॉ. वि. ना. कदम यांचा समितीत सदस्य म्हणून समावेश आहे.

मानव-वन्यजीव संघर्ष टाळता येईल
इसापूर अभयारण्यात वन्यजीवांचा अधिवास यातून निश्‍चित करता येईल. त्यामुळे भविष्यातील मानव-वन्यजीव संघर्ष टाळता येईल. तसेच पर्यटकांसाठी काही भाग राखीव ठेवून जंगल पाऊलवाट, निसर्ग पर्यटन केंद्र, पक्षीनिरीक्षण कुटी विकसित करण्यात येईल. पर्यटकांना वन्यजीव व वृक्षराजीचा आनंद घेता येईल.
अरविंद मुंढे
उपवनसंरक्षक, पुसद  


संपादन - स्वाती हुद्दार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com