हे गडचिरोली की "धूळचिरोली'?

गडचिरोली : धूळ उडू नये म्हणून त्यावर असे पाणी टाकण्यात येते. पण, हा उपाय फारच तोकडा आहे.
गडचिरोली : धूळ उडू नये म्हणून त्यावर असे पाणी टाकण्यात येते. पण, हा उपाय फारच तोकडा आहे.


गडचिरोली : मागील अनेक महिन्यांपासून बांधण्यात येत असलेला राष्ट्रीय महामार्ग शहराच्या मध्यभागातून जातो. हा महामार्ग बांधताना सलग न बांधता तुकड्यात बांधण्यात आला. दोन तुकड्यांच्या मध्ये माती आणि मुरूम टाकण्यात आला आहे. त्यामुळे प्रचंड धूळ उडत असून आजाराचे प्रमाण वाढले आहे. नागरिकांना श्‍वसन, डोळे, त्वचा, केसांच्या आजारांचा सामना करावा लागत आहे.
सध्या गडचिरोली शहरात इतकी धूळ आहे की, गडचिरोलीचे नाव बदलून "धूळचिरोली' का ठेवू नये, असा प्रश्‍न नागरिक विचारत आहेत. या जिल्ह्याच्या सीमा छत्तीसगड, तेलंगणा राज्याला लागून असल्यामुळे या राज्यातून राष्ट्रीय महामार्गाद्वारे अनेक अवजड वाहने गडचिरोली मार्गे जातात.
ही वाहने शहरातून जाताना प्रचंड धूळ उडवतात. अनेकदा धुळीमुळे वाहनचालकांना पुढचे काही दिसत नाही. त्यामुळे अनेक अपघात होत आहेत. सर्वाधिक त्रास लहान बालके आणि दमा रुग्णांना सहन करावा लागत आहे. धूळ नाकात गेल्याने अनेकजण सर्दी, खोकला आणि नंतर तापाने ग्रस्त होत आहेत.
दमा रुग्णांना या रस्त्यावरून जाणे कठीण झाले आहे. ही धूळ श्‍वसनामार्गे फुफ्फुसात जात असल्याने अधिकच त्रास सहन करावा लागत आहे. सध्या थंडीचे दिवस असून वाऱ्याचा वेग कमी आहे.
त्यामुळे ही धूळ वातावरणात अधिक वेळ असते. शिवाय सकाळी धुके पडते आणि वाहनांमधून निघणारा धूरही असतो. धुके, धूर आणि धूळ या तिन्हींचे एकत्रीकरण होऊन "धुरके' नावाचा अधिक त्रासदायक प्रकार सुरू होतो. सततची धूळ केसांमध्ये बसून आता केसगळतीचे प्रमाण वाढले आहे.
अनेक कामगारांना कष्टाची कामे करावी लागतात. त्यांना घाम गाळावा लागतो. त्यांच्या शरीरावरील घाम आणि धुळीचे मिश्रण तयार होऊन त्यांना खरूज, अंगावर फोड येणे, असे अनेक त्वचारोग होत आहेत. ही सगळी समस्या रस्त्याच्या सदोष बांधणीमुळे झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. हा रस्ता पूर्ण तयार केल्यावरच वाहतुकीसाठी सुरू करायला हवा होता.
पण, नागरिकांचा रोष वाढू नये म्हणून रस्त्याच्या तुकड्यांमध्ये माती, मुरूम आदी भर घालून वाहतुकीची सोय करण्यात आली. त्यातून उडणाऱ्या धुळीकडे दुर्लक्ष करण्यात आले. शिवाय बाजूचा रस्ता तोडणे सुरूच असल्याने तिथूनही प्रचंड धूळ उडत आहे.
येथील चामोर्शी व इतर मार्गांवरील खड्डे बुजविण्यासाठी मुरूमच टाकण्यात आला. हा मुरूम उन्हाने खडखडीत वाळून आता धूळ निर्माण करत आहे. त्यामुळे प्रदूषणविरहित शहर म्हणून ओळख असलेल्या गडचिरोली शहरात धुळीचे प्रदूषण आणि त्यातून अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.
नागरिकांचा रोष वाढू नये म्हणून अधूनमधून रस्त्यावर पाणी शिंपडण्यात येते. पण, हा उपाय अतिशय तोकडा असल्याचे नागरिकांचे मत आहे.
बालकांसाठी धोकादायक
ही धूळ बालकांसाठी अत्याधिक धोकादायक आहे. बालकांना सर्दी, खोकला होण्याचे सर्वांत पहिले कारण ही धूळच असते, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे स्पष्ट मत आहे. सर्दी, खोकल्या मागे आधी धूळ हेच कारण असते. थंड किंवा आंबट पदार्थ हे दुय्यम कारण आहे.
बालकांना शहरातील रस्त्यांवरून नेल्यास त्यांच्या नाका, तोंडात धूळ जाऊन ते पटकन आजारी पडतात. त्यामुळे अनेकांना रुग्णालयात दाखल करावे लागत आहे.
काही डॉक्‍टरांनी आपल्या बालकांना आजारापासून वाचविण्यासाठी गडचिरोली-चंद्रपूर, गडचिरोली-चामोर्शी या धुळभरल्या मार्गांवरून अजिबात फिरवून नये, असा सल्लाही दिला आहे.

नागरिकांनी  काळजी घ्यावी
सध्या शहरात धुळीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. या धुळीमुळे दम्याचे रुग्ण हैराण होत आहेत. शिवाय लहान बालकांनाही प्रचंड त्रास होत आहे. धुळीमुळे श्‍वसनाचे विकार, त्वचाविकार, केसगळती, ऍलर्जीचे आजार, लहान बालकांचे आजार मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यामुळे नागरिकांनी स्वत:ची आणि आपल्या बालकांची काळजी घ्यावी. धुळीपासून बालकांचा बचाव करावा.''
- डॉ. प्रशांत चलाख, बालरोग तज्ज्ञ, गडचिरोली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com