अहो आश्‍चर्य! पळसाच्या झाडातून निघतेय सॅनिटायझर!!

गुरुवार, 28 मे 2020

शहरापासून पूर्व दिशेला एक किलोमीटर अंतरावर असलेल्या पळसाच्या झाडामधून दवबिंदूसारखे द्रव फवाऱ्यासारखे बाहेर फेकल्या जात आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये आश्‍चर्य व्यक्त केले जात असून ते त्याचा सॅनिटायझर म्हणून वापर करीत आहेत.

धामणगावरेल्वे (अमरावती) : मनुष्याला चमत्काराचे वेड आहे. रोजच्या त्याच त्या जगण्याला कंटाळलेला मनुष्य काहीतरी नवे शोधत असतो. असे निसर्गात असे काही निराळे दिसले की आपण त्याला चमत्काराचे नाव देतो. त्याला देवाची करणी समजतो आणि तिथे आपोआपच गर्दी जमा होऊ लागते. काही वर्षांपूर्वी देवाची मूर्ती दूध पित असल्याच्या चमत्काराची चर्चा अशीच सगळीकडे रंगली होती. आता पळसाच्या झाडातून बाहेर येणाऱ्या द्रव पदार्थविषयीही चर्चा रंगली आहे आणि ते पाहण्यासाठी लोक गर्दी करीत आहेत.
शहरापासून पूर्व दिशेला एक किलोमीटर अंतरावर असलेल्या पळसाच्या झाडामधून दवबिंदूसारखे द्रव फवाऱ्यासारखे बाहेर फेकल्या जात आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये आश्‍चर्य व्यक्त केले जात असून ते त्याचा सॅनिटायझर म्हणून वापर करीत आहेत.
धामणगाव शहरातील परसोडी रस्त्यावर असलेल्या व्हीआयपीनगरमधील दहा ते बारा फुटांच्या पळसाच्या झाडामधून मागील तीन-चार दिवसांपासून द्रव पदार्थ निघत आहे. या भागातून पाण्याची पाइपलाइन गेली नाही. अथवा बाजूला पाण्याचा मोठा स्रोत नाही, तरीही पळसाच्या झाडामधून दवबिंदूसारख्या द्रवाची फवारणी होत असल्याने या भागातील अनेक नागरिकांनी त्याचा सॅनिटायझर म्हणून वापर सुरू केला आहे. हा प्रकार मागील तीन ते चार दिवसांपासून सतत सुरू आहे. हा चमत्कार आहे असे समजून अनेक नागरिकांनी येथे गर्दी करून या झाडाचे दर्शन घेणे सुरू केले आहे. या झाडावर अनेक किडे दिसतात. हे किडे हे द्रव बाहेर फेकू शकतात, असे वनस्पतिशास्त्र विभागाचे म्हणणे आहे.

सविस्तर वाचा - ठोसे लगावत तिने गाठले यशोशिखर

तापमानवाढीमुळे निघते द्रव
वाढते तापमान व वातावरणातील बदलामुळे झाडे हायराथ्रोस नावाचे द्रव बाहेर फेकतात. त्यातीलच हा प्रकार असू शकतो, असे मत स्कूल ऑफ स्कॉलरच्या पल्लवी वानखेडे यांनी व्यक्त केले. मागील काही दिवसांपासून आमच्या घरासमोर 12 फुटांच्या पळसाच्या झाडातून दवबिंदूसारखी फवारणी होत आहे. काही जण त्याचा सॅनिटायझर म्हणून वापर करीत आहेत, अशी माहिती कमल जोशी यांनी दिली. पळसाच्या झाडावर अँफीड नावाचे रसशोषक किडे असतात. हे किडे झाडातील रस शोषून घेतल्यावर तो बाहेर फेकतात. यामुळे दवबिंदूसारखी फवारणी होते. हा रस गोड असतो. माणसाच्या शरीरावर तो पडला तरी काहीही अपाय होत नाही, असे आदर्श महाविद्यालयाचे प्राध्यापक एस. पी. पाटील यांनी सांगितले.