थंडी आली रे... पारा दीड अंशाने घसरला 

file photo
file photo

नागपूर  : उत्तर भारतात बर्फवृष्टी सुरू झाल्यामुळे विदर्भात थंडी वाढली असून, गेल्या चोवीस तासांत नागपूरचा पारा दीड अंशाने घसरला आहे. अनुकूल वातावरणामुळे या आठवड्यात थंडीचा कडाका आणखी वाढण्याची शक्‍यता प्रादेशिक हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आली आहे. 


यंदा मॉन्सूनचा मुक्‍काम उशिरापर्यंत लांबल्याने थंडी गायब झाली होती. त्यामुळे वैदर्भींना यंदाची दिवाळी काहीशी दमट वातावरणात "सेलिब्रेट' करावी लागली. मात्र, मॉन्सूनसोबतच अवकाळी पावसानेही निरोप घेतल्याने हळूहळू थंडी पडायला सुरुवात झाली आहे. हवेतील गारठा अचानक वाढल्याने नागपूरकरांना गेल्या एक-दोन दिवसांपासून थंडी जाणवायला लागली आहे.

बुधवारी 15.7 अंशांवर गेलेला नागपूरचा पारा चोवीस तासांत 1.3 अंशाने घसरून 14.4 अंशांवर आला. विदर्भात सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद यवतमाळ (14 अंश सेल्सिअस) येथे करण्यात आली. विदर्भातील इतरही जिल्ह्यांमध्ये हळूहळू थंडीचा प्रभाव जाणवू लागला आहे. दिवसभर निरभ्र आकाशामुळे दुपारच्या सुमारास उन्हाचे थोडेफार चटके बसतात, मात्र सायंकाळी होताच हवेत गारठा पसरतो. पहाटेच्या सुमारास धुके व दवाच्या चादरीमुळे थंडीचा प्रभाव सर्वाधिक जाणवतो आहे.

थंडीचा कडाका दिवसेंदिवस वाढत चालल्याने कपाटात ठेवलेले स्वेटर्स, मफलर्स व कानटोपरे हळूहळू बाहेर पडू लागले असून, स्वेटर्सची विक्री करणाऱ्या नेपाळी दुकानदारांच्या दुकानांवरही गर्दी वाढू लागली आहे. विदर्भातील थंडीचा इतिहास बघितल्यास, नोव्हेंबर महिन्यात साधारणपणे पारा दहा अंशांपर्यंत घसरतो. थंडीसाठी सध्याचे वातावरण अनुकूल असल्याने, या आठवड्यात पारा आणखी खाली घसरण्याची दाट शक्‍यता आहे. तसे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. 

यंदा विक्रम मोडीत निघणार 
विदर्भात सर्वाधिक कडाक्‍याची थंडी डिसेंबर महिन्यात जाणवते. गतवर्षी 29 डिसेंबरला नागपूरचा पारा शतकातील विक्रमी 3.5 अंशांवर गेला होता. यावर्षी तो विक्रम मोडीत निघणार काय, याबद्दल नागपूरकरांमध्ये निश्‍चितच उत्सुकता राहील. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com