वडिलोपार्जित घरासाठी जगन्नाथांचा संघर्ष!

नरेंद्र चोरे
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

नागपू : वृद्ध मंडळी आपल्या मुलांकडे म्हातारपणीचा आधार म्हणून बघतात. आयुष्याच्या संध्याकाळी काळजी घ्यावी एवढीच त्यांची मुलांकडून माफक अपेक्षा असते. मात्र, सर्वच जण याबाबतीत नशीबवान ठरतात, असे नाही. जगन्नाथ गोविंदा मानकर हे अशाच दुर्दैवी वृद्धांपैकी एक. 80 वर्षीय जगन्नाथ हे मुलगा व सुनेकडून होत असलेल्या छळामुळे त्रस्त असून, त्यांच्या जाचातून मुक्‍तता मिळण्यासाठी तसेच वडिलोपार्जित घराचा ताबा मिळण्यासाठी जगन्नाथांची सध्या धडपड सुरू आहे.

खामला, बुद्धविहार झोपडपट्‌टी भागात राहणारे जगन्नाथ यांना दोन मुले व मुलगी आहे. स्वत: कष्ट उपसून त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना स्वत:च्या पायावर उभे केले, लग्न लावून दिले. थोरला मुलगा पानठेला व डेली नीड्‌सचे दुकान चालवितो, तर धाकटा ऑटोरिक्षा चालवून कुटुंब पोसतो. दोघेही खामला परिसरातील एका छोट्याशा घरात वास्तव्य करतात. जगन्नाथ आणि त्यांची अर्धांगिनी (इंदू) लहान मुलाच्या आधाराने आयुष्याचे दिवस ढकलत आहेत. कधीकाळी ते मोठ्या मुलाच्या दुकानात बसायचे. मात्र, सुनेने चोरीचा आरोप लावल्याने त्यांचे दुकानात जाणे-येणे बंद झाले. तेव्हापासून मोठ्या मुलाचे घरही त्यांच्यासाठी कायमचे बंद झाले. धाकट्या मुलाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे ते त्याच्याकडे राहण्यास इच्छुक नाही. परंतु, जगण्याचा दुसरा आधारही त्यांच्याकडे नाही. त्यामुळे नाइलाजाने ते आयुष्याचा एकेक दिवस काढत आहेत.
जगन्नाथ यांचा सर्वाधिक रोष मोठ्या सुनेवर दिसून आला. तापट स्वभावाच्या बाईमुळे मुलगा माझ्यापासून दूर गेल्याचे त्यांचे म्हणणे आहे. जगन्नाथ यांचे जुन्या वस्तीतही वडिलोपार्जित घर आहे. मात्र, ते मोठ्या मुलाने किरायाने दिले, पैसेही तोच घेतो. थोरल्याचा पांडे ले-आउटमध्येही किरायाने दिलेला फ्लॅट असल्याचे त्यांनी सांगितले. दोन-दोन दुकाने, फ्लॅट व घराचा किराया येऊनही मुलगा एका दमडीचीदेखील मदत करीत नाही. पैसे व जेवण तर दूर, साधा चहादेखील देत नसल्याची तक्रार त्यांनी यावेळी केली. अन्यायाविरोधात त्यांनी पोलिसांकडेही दाद मागितली. पण, तिथेही त्यांचे कुणी ऐकून घेतले नाही. त्यामुळे नाइलाजाने त्यांनी "सकाळ' कार्यालय गाठले.
जगन्नाथ एकेकाळी सीताबर्डी येथील कोठारी प्रेसमध्ये "कंपोजिटर' म्हणून काम करायचे. 30 वर्षे इमानेइतबारे कष्ट केल्यानंतर ते "रिटायर्ड' झाले. पण, आयुष्याची जमापुंजी मुलाबाळांसाठी खर्च झाल्याने व पेन्शन मिळत नसल्यामुळे मुले असूनही ते सध्या निराधार जीवन जगत आहेत.
मुलाच्या ताब्यातील घर मिळावे
सध्या मोठ्या मुलाच्या ताब्यात असलेले वडिलोपार्जित घर आपल्याला मिळावे, अशी त्यांची मागणी आहे. घराच्या किरायाद्वारे मिळणाऱ्या पैशातून पुढील आयुष्य सुखाने व आनंदाने जगता येईल. शिवाय मुलांकडे हात पसरण्याची गरजदेखील पडणार नाही, असे ते म्हणाले.

Web Title: Jagannatha struggle for house