आत्महत्याग्रस्त शेतकरी पाल्यांना "जगदंबा'चा हात

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 9 July 2019

यवतमाळ : नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी जीवनयात्रा संपवीत आहेत. कुटुंबाचा आधारवड कोसळल्याने कित्येक मुलांवर शिक्षण अर्धवट सोडण्याची वेळ येते. मात्र, आत्महत्याग्रस्त शेतकरी पाल्यांसाठी यवतमाळातील जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालय प्रशासनाने मदतीचा हात पुढे केला आहे. कमीत कमी 25 व जास्तीत जास्त 50 विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी मोफत प्रवेश देण्यात येणार आहे.

सामाजिक उपक्रम राबविण्यात जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालय नेहमीच अग्रेसर राहिले आहे. यापूर्वी 32 आत्महत्याग्रस्त शेतकरी पाल्यांचे अभियंता होण्याचे स्वप्न महाविद्यालयाने पूर्ण केले. या 2019-20मध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांना मोफत प्रवेश देण्यात येणार असल्याचा निर्णय महाविद्यालयीन प्रशासनाद्वारे घेण्यात आला. प्रवेशार्थी विद्यार्थी व विद्यार्थिनींना वसतिगृहात राहण्याची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती संस्थेचे सचिव डॉ. शीतल वातिले यांनी दिली. याप्रसंगी संचालक पवन वातिले, प्राचार्य डॉ. हेमंत बारडकर, सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. महाविद्यालयाला नुकतेच नॅक बंगलोरद्वारा नामांकन प्राप्त झाले आहे. महाविद्यालयातील सोयी-सुविधांत अनेक नवीन प्रकारची उपकरणे, ग्रंथालयात डिजिटल लायब्ररी, ई-लर्निंग रिसोर्स व विद्यार्थ्यांना भविष्यात स्वतःचा उद्योग उभारण्यासाठी मार्गदर्शन, तांत्रिक पाठबळ देण्यासाठी इन्कुबेशन सेंटरची स्थापना करण्यात आली. इन्कुबेशन सेंटरद्वारे स्वयंम रोजगाराच्या संधी कशा निर्माण होतील, याबाबत तज्ज्ञांचा सल्ला उपलब्ध करून देण्यात येतो.

गेल्या काही वर्षांपासून जगदंबा अभियांत्रिकीचे विद्यार्थी अमरावती विद्यापीठाच्या मेरिट यादीत येत आहेत. विद्यार्थ्यांना परदेशात उच्चशिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात येते. सामाजिक जाणिवेतून विदर्भातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांना मोफत प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- डॉ. शीतल वातिले,
सचिव, जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालय, यवतमाळ.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: "Jagdamba" hand for suicide victims