पेरणीची सोय नसल्याने शेतकऱ्याने घेतला गळफास

मनोज खुटाटे
मंगळवार, 6 जून 2017

जलालखेडा येथील शेतकरी मोतीराम बनकरने सोडली आशा
जलालखेडा - संपूर्ण देशात शेतकरी आंदोलनाची आग फोफावत असतानाच जलालखेडा येथील तरुण शेतकरी मोतीराम सीताराम बनकर (वय 40) यांनी रविवारी (ता. 4) रात्री घरी पंख्याला पत्नीची साडी बांधून गळफास घेतला. त्यात त्यांचा मृत्यू झाला.

जलालखेडा येथील शेतकरी मोतीराम बनकरने सोडली आशा
जलालखेडा - संपूर्ण देशात शेतकरी आंदोलनाची आग फोफावत असतानाच जलालखेडा येथील तरुण शेतकरी मोतीराम सीताराम बनकर (वय 40) यांनी रविवारी (ता. 4) रात्री घरी पंख्याला पत्नीची साडी बांधून गळफास घेतला. त्यात त्यांचा मृत्यू झाला.

मोतीराम सीताराम बनकर हे घरात सर्वांत मोठे होते. म्हातारे आईवडील, दोन लहान भाऊ, पत्नी व दोन मुलीचा संसार, असा संसाराचा गाडा त्यांच्या मागे होता. सततची नापिकी व मालाला भाव न मिळाल्याने त्यांच्यावर असलेले मित्र व नातेवाईकाचे कर्ज वाढतच गेले.

अशात आता कोण उधार देणार, शेती करायची कशी, यासर्व प्रश्‍नांनी त्यांना चिंताग्रस्त केले. पेरणीचे दिवस जवळ आले असताना खिशात दमडी नाही. शेती करायची कशी, या विचारात असलेल्या मोतीराम बनकर यांनी रविवारी(ता.4) रात्री शयनकक्षातील पंख्याला पत्नीच्या साडीने लटकून आत्महत्या केली. दोन एकर कोरडवाहू शेती व मजुरीच्या सहाय्याने घरातील म्हातारे आईवडील, पत्नी प्रीती (वय 33), दोन मुली पायल (वय 8 व धनश्री (वय 6) यांचा उदरनिर्वाह करणारे मोतीराम मागील काही वर्षांपासून नैसर्गिक संकटामुळे हवालदिल झाले होते. यावर्षी त्यांनी भरउन्हात मजुरी करीत पेरणीसाठी शेती तयार केली होती. परंतु, पेरणीसाठी आता त्याच्या जवळ काहीच नव्हते. परिस्थितीची कल्पना त्यांच्या पत्नीला होती. घरचे सगळे जेवण करीत असल्याचे निमित्त साधून कोणालाच न सांगता ते खोलीत गेले व गळफास लावून घेतला. शेजाऱ्यांच्या मदतीने मोतीराम यांना खाली उतरविले व येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. सोमवारी(ता. 5) त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: jalalkheda vidarbha news farmer suicide