कॉंग्रेस, वंचितसमोर उमेदवार निवडीची कसरत

पंजाबराव ठाकरे
गुरुवार, 15 ऑगस्ट 2019

जळगाव जामोद मतदारसंघाला भाजपने अल्प काळासाठी मंत्रिपद देऊन पक्ष हित साधण्याचा प्रयत्न केला. तर चौथ्यांदा भाजपच्या उमेदवाराला टक्कर देण्यासाठी तगडा उमेदवार निवडीची कॉंग्रेस, वंचित आघाडीला मोठी कसरत करावी लागणार असेच चित्र सद्यस्थितीत दिसत आहे. म्हणूच प्रथमच कॉंग्रेसकडून घेण्यात आलेल्या मुलाखतीमध्ये उमेदवारी मागण्यासाठी चढाओढ दिसून आली नाही. कारण सर्व इच्छुकांनी हा निर्णय पक्ष श्रेष्ठीवर सोडला आहे. ही कॉंग्रेसमधील अंतर्गत एकी समजावी की, मनातील धाकधूक हे वेळेवरच समजेल.

जळगाव जामोद : जळगाव जामोद मतदारसंघावर भाजपने चांगलीच पकड निर्माण केली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये सेनेचे प्रतापराव जाधव यांना मिळालेले मताधिक्‍य हे त्याचे उदाहरणच म्हणावे लागेल. कॉंग्रेस राष्ट्रवादीचा हा गड गत तीन विधानसभा निवडणुकीत भाजपने काबीज केलेला आहे. आमदार आणि मंत्री असलेले डॉ. संजय कुटे यांनी मतदारसंघासाठी काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याने त्यांचे वजन मतदार संघात वाढले आहे.
गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत भारिपने कॉंग्रेसपेक्षा सरस मतदान घेऊन आपली ताकद दाखवत प्रसेनजीत पाटील यांचे माध्यमातून सलग दोनवेळा तगडे आव्हान उभे केले होते. मात्र, भाजपकडून युतीचे डॉ. संजय कुटे यांनी बाजी मारली. यात कॉंग्रेस तीन नंबरवर गेली. आता प्रसेनजीत पाटील कॉंग्रेसमध्ये आल्याने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसकडून वेगळी रणनीती आखली जाणार काय? हा प्रश्न ही राजकीय पटलावर चर्चेचा ठरत आहे. या मतदारसंघात कॉंग्रेसकडून प्रत्येक विधानसभा निवडणुकसाठी इच्छुकांची गर्दी दिसत असे. उमेदवारीच्या स्पर्धेत गटबाजी झाल्याचा अनुभवही कॉंग्रेस पक्ष श्रेष्ठीकडे आहेच. मात्र, यावेळी पहिल्यांदा पक्षाने दिलेली उमेदवारी सर्वांना मान्य असल्याचा सूर कॉंग्रेसच्या मुलाखतीमध्ये या मतदारसंघातील नेत्यांकडून ऐकायला मिळाला. यावरही तर्कवितर्क काढले जात आहेत. सत्तेसाठी आपसात भांडण्यापेक्षा विजयासाठी एकसंघ राहून भाजपला कडवे आव्हान देण्याची ही कॉंग्रेसची तयारी म्हणावी का? दुसरीकडे भाजपचे उमेदवार म्हणून कामगारमंत्री डॉ. संजय कुटे हेच असणार आहेत. तर कॉंग्रेसकडून प्रसेनजीत पाटील, प्रकाश पाटील अवचार, अविनाश उमरकर, स्वाती वाकेकर, ज्योती ढोकणे, संतोषराव राजनकार हे इच्छुक आहेत. परंतु, आज भाजपने आदिवासीबहुल या मतदारसंघाला मंत्रिपद देऊन पक्षाची बाजू भरभक्कम करण्याचा डाव खेळला असे म्हटल्यास गैर ठरणार नाही. या मतदारसंघात वंचित आघाडीची ताकद ही बरीच आहे. सतत दोनवेळा दोन नंबरची मते घेतल्याने या आघाडीकडे राजकीयदृष्ट्या दुर्लक्ष करून चालणार नाही. वंचितची कॉंग्रेससोबत युती झाली तर या मतदारसंघासाठी वंचितकडून उमेदवारीचा दावा ही केला जाऊ शकतो. असे झाले तर या मतदारसंघातील कॉंग्रेस नेत्यासाठी हा मोठा मास्टर स्ट्रोक असेल यात शंका नाही. सोबतच स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून उमेदवारीची तयारी दिसत आहे. परंतु, याचा फारसा कुणावर परिणाम होईल असे दिसत नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgaon jamod vidhansabha constitution article