जानकरांच्या राजीनाम्यावर विरोधक आक्रमक

जानकरांच्या राजीनाम्यावर विरोधक आक्रमक

प्रश्‍नोत्तराच्या तासावर बहिष्कार; कामकाज दिवसभरासाठी तहकूब
नागपूर - निवडणूक आयोगाने गुन्हा दाखल केल्यामुळे पशुसंवर्धन आणि दुग्ध विकासमंत्री महादेव जानकर यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी आज विधानसभेत आणि विधान परिषदेत विरोधकांनी लावून धरली. त्यासाठी प्रश्‍नोत्तराच्या तासावर बहिष्कार घालत विरोधकांनी सभात्याग केला. याच मुद्यावर दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

महादेव जानकर यांनी गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज येथील नगरपालिका निवडणूक अधिकाऱ्याला फोन करून कॉंग्रेस उमेदवाराचा अर्ज बाद करावा म्हणून दबाव टाकला होता. याप्रकरणी कॉंग्रेसच्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने देसाईगंज वॉर्ड क्रमांक 9 ब मधील निवडणूक प्रक्रिया रद्द केली आहे. तसेच जानकर यांच्याविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. प्रश्‍नोत्तराचा तास सुरू होताच कॉंग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी हा मुद्दा उपस्थित केला. तसेच विधानसभा नियम 57 अन्वये स्थगन प्रस्तावाची सूचना मांडत चर्चेचा आग्रह धरला.

राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनीही जानकरांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने त्यांना मंत्रिपदावरून बडतर्फ करावे, अशी मागणी केली. त्याचवेळी भाजप आमदार आशिष शेलार हे जानकर यांच्या बचावासाठी पुढे आले. ते म्हणाले, संबंधित उमेदवाराने लेखी म्हणणे दिले आहे. कपबशी चिन्हावर निवडणूक लढवण्याची उमेदवारानेच मागणी केली होती. तसेच निवडणूक आयोगाने जानकर यांना दोषी धरलेले नाही, त्यामुळे त्यांच्यावर कारवाईचा प्रश्‍नच नाही, असा मुद्दाही त्यांनी मांडला. यादरम्यान, एकीकडे पहिला तारांकित प्रश्‍न आणि दुसरीकडे विरोधक जानकर यांच्या राजीनाम्याची मागणी करीत होते. या वेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी नियम 57 अन्वये हा विषय होत नाही. तसेच यासंदर्भातील म्हणणे रेकॉर्डवरून काढू का, असा इशाराही त्यांनी विरोधकांना दिला. त्यामुळे संतप्त विरोधकांनी सरकार रेटून सभागृह चालवत असल्याचा आरोप करीत सभात्याग करून निषेध नोंदवला. प्रश्‍नोत्तराचा तास संपल्यानंतर बारा वाजता विरोधक पुन्हा सभागृहात परतले. या वेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जानकरविरोधी मोहिमेची सूत्रे स्वतःकडे घेत सरकारला नैतिकतेचे फटकारे हाणले. दिलीप वळसे-पाटील यांनीही विरोधकांच्या मागणीला बळ दिले.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, जानकर यांच्यावर जामीनपात्र गुन्हा दाखल झाला आहे. त्याची चौकशी होईल. या चौकशीत जानकर दोषी आढळले तर कारवाई होईल, अन्यथा होणार नाही, असे स्पष्टीकरण देत जानकरांना अप्रत्यक्षरीत्या पाठीशीच घातले. विरोधक मात्र जानकर यांच्या राजीनाम्यावर ठाम होते. जानकर यांच्या राजीनाम्याची आग्रही मागणी करीत सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. या गोंधळातच सत्ताधाऱ्यांनी पुरवणी मागण्या आणि महाराष्ट्र आधार विधेयक आणि इतर कामकाज उरकून घेतले. त्यानंतर दुपारी सभागृह दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. विधान परिषदेतही विरोधी पक्षाच्या नेत्यांनी जानकर यांच्याविरोधात तीव्र आघाडी उघडली. राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी या मुद्यावर स्थगन प्रस्तावाची सूचना मांडली होती. विरोधकांच्या आक्रमक पवित्र्यामुळे सभागृहाचे कामकाजही दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

एकनाथ खडसे यांच्यावर केवळ आरोप झाले, तर त्यांचा काटा काढण्यात आला. आता जानकर यांच्यावर तर निवडणूक आयोगानेच गुन्हा दाखल केला आहे, तेव्हा त्यांचाही राजीनामा घ्यावा. जानकर यांनी मंत्रिपदाचा दुरुपयोग केला आहे.
- विजय वडेट्टीवार, आमदार, कॉंग्रेस.

हा पैशांपेक्षा मोठा भ्रष्टाचार आहे. संपूर्ण राज्याने जानकर निवडणूक अधिकाऱ्याला धमकावत असल्याचा व्हिडिओ पाहिला आहे. सरकार राज्यात चुकीचा पायंडा पाडत आहे.
- पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री.

आघाडी सरकारमध्ये गुलाबराव देवकर यांना तर न्यायालयाने जामीनही फेटाळला होता. तरीही ते वर्षभर मंत्रिमंडळात होते. त्यामुळे जानकर यांच्याबाबतीतही प्रथा आणि परंपरेनुसार कारवाई व्हावी.
- अनिल गोटे, आमदार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com