#JantechaJahirnama : सावनेर मतदारसंघात थोडा हैं थोडे की जरुरत हैं 

मनोहर घोळसे
शनिवार, 14 डिसेंबर 2019

पंचवीस वर्षांपासून जिल्ह्यातील राजकारणात आमदार सुनील केदार यांचा दबदबा कायम आहे. स्वर्गीय बाबासाहेब केदार यांनी उभारलेले सहकार क्षेत्र व त्यांच्या प्रेरणेतून राजकारणात सक्रिय झालेले सुनील केदार 1995 पासून आमदार आहेत.

सावनेर : गेल्या 25 वर्षांपासून सावनेर विभानसभा क्षेत्राचे नेतृत्व करीत असलेले आमदार सुनील केदार यांची सावनेरच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यावर पकड आहे. विरोधात असतानाही मतदारसंघांच्या विकासासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणला. त्या निधीतून बरीच कामे मार्गी लागली. परंतु तालुक्‍यातील बरीच काम अद्याप प्रलंबित आहेत. या कामांसोबतच स्थानिक सुशिक्षित बेरोजगारांचे प्रश्‍न सोडविणे गरजेचे आहे. ग्रामीण भागात आरोग्य सुविधांची वानवा आहे. चांगले आरोग्य मिळणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील अगदी शेवटच्या माणसाला न्याय मिळणे हे लोकप्रतिनिधींचे कर्तव्य आहे ते त्यांनी पार पाडावे. याशिवाय वन्यप्राण्यांच्या हैदोसापासून मुक्‍ती मिळावी. वन्यप्राण्यांच्या भीतीमुळे नागरिक त्रस्त आहेत. भयमुक्‍ती जीवन मिळावे, एवढीच माफक अपेक्षा नागरिकांची आहे. 

सर्वांगीण विकास हाच ध्यास

पंचवीस वर्षांपासून जिल्ह्यातील राजकारणात आमदार सुनील केदार यांचा दबदबा कायम आहे. स्वर्गीय बाबासाहेब केदार यांनी उभारलेले सहकार क्षेत्र व त्यांच्या प्रेरणेतून राजकारणात सक्रिय झालेले सुनील केदार 1995 पासून आमदार आहेत. ही त्यांची पाचवी टर्म आहे. त्यामुळे मतदारसंघातील कानाकोपऱ्यांत त्यांची आगळीवेगळी ओळख आहे. कौटुंबिक संबंध जोपासणे त्यांचा स्वभाव असल्याने गल्लीबोळात कार्यकर्त्यांची फौज आहे. नागपूर-भोपाळ मार्गावरील दहेगावपासून मध्य प्रदेशच्या सीमेपर्यंत तर खाप्यापासून कळमेश्‍वरपर्यंत त्यांचा मतदारसंघ विस्तारलेला आहे. जिल्ह्याच्या राजकारणात त्यांचा दबदबा असल्याने कॉंग्रेस पक्षात वजन आहे. अनुभवी व अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून प्रशासनावरही त्यांचा वचक आहे. क्षेत्राचा सर्वांगीण विकास हा त्यांचा ध्यास आहे. 1995 मध्ये प्रथम या क्षेत्राचा आमदार झाल्यानंतर गावागावांतील मूलभूत सुविधा, शेतकऱ्यांचा सिंचनाचा प्रश्‍न अशा अनेक समस्या उभ्या असताना "एकही नारा मतदार क्षेत्र बने सबसे न्यारा' या भावनेतून क्षेत्राला हरितक्रांतीसाठी वरदान ठरणाऱ्या कन्हान नदीवरील कोच्छी बॅरेज प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले. 

 

प्रतिमेत याचा समावेश असू श्‍ाकतो: एक किंवा अधिक लोक, लोकं उभी आहेत आणि बाहेरील
मानसिंग अभायारण्यात पर्यटनस्थळाचे काम सुरू आहे.

कन्हान नदीवरील कोच्छी बॅरेज प्रकल्प

 
सदर योजना नागपूर शहराच्या परिघात वाहणाऱ्या गोदावरी खोऱ्याच्या प्राणहिता उपनद्यातील कन्हान महत्त्वाची नदी असताना अद्याप एकही प्रकल्प बांधण्यात आलेला नाही. महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमेपासून आठ किलोमीटर खालील बाजूस नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्‍यात कोच्छी गावाजवळ कन्हान नदी प्रकल्प कोच्छी बॅरेज बांधकामाधीन आहे. प्रकल्पात एकूण अपेक्षित पाणीसाठा 75.06 दलघमी आहे. त्यापैकी सिंचनाकरिता 48.48 दलघमी, मराविम (औद्योगिक) 15.00 दलघमी, पिण्याच्या पाण्याकरिता 5.39 दलघमी राहणार आहे. 
 
  
कृषीआधारित प्रक्रिया उद्योग निर्माण व्हावे

 
कृषीवर आधारित उद्योग व इतर औद्योगिक कारखानदारी वाढीस लागणे गरजेचे आहे. त्यामुळे बेरोजगारांच्या हाताला काम मिळेल. तरुणांच्या हाताला काम मिळाले म्हणजे गुन्हेगारीवर जरब बसेल. नागपूरसारखी मोठी बाजारपेठ जवळ असल्याने प्रक्रिया उद्योगांना चांगले दिवस आहेत. मालाची ने-आण सुलभ झाल्यास उद्योगांना भरभराट येईल. 
 
बेरोजगारीचा प्रश्‍न मिटावा

 नागपूरसारखे मोठे शहर जवळ असल्याने आणि शिक्षणाचे महत्त्व कळल्याने ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात सुशिक्षितांचा भरणा आहे. परंतु, शिकूनही हाताला काम नसल्याने तरुण सैरभैर आहेत. तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी लोकप्रतिनिधींकडून प्रयत्न होणे गरजेचे आहे. 

हेही वाचा : रामटेक मतदारसंघाला विकासाची आस 

आरोग्य व्यवस्था बळकट व्हावी

 ग्रामीण भागात आजही आरोग्य सुविधांच्या नावाने बोंब आहे. लहानसहान आजारांसाठी रुग्णाला नागपूरला हलवावे लागते. गावागावांमध्ये महिलांसाठी प्रसूतीसाठी व्यवस्था नाही. वाढत्या लोकसंख्येनुसार आरोग्य व्यवस्था बळकट होणे गरजेचे आहे. शासकीय रुग्णालयांमध्ये चांगली आरोग्य सुविधा मिळणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. 

 
वन्यप्राण्यांपासून पिकांचे संरक्षण व्हावे

 मतदारसंघातील बराच ग्रामीण भाग जंगलालगत असल्याने वन्यप्राण्यांचा धोका असतो. हातातोंडाशी आलेले पीक वन्यप्राणी उद्‌ध्वस्त करीत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होते. यापेक्षा शेती पडीत ठेवण्याचा पर्याय शेतकऱ्यांकडून निवडला जातो. वनकायद्यामुळे वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा कसा, असा प्रश्‍न शेतकऱ्यांना पडतो. जंगलालगत असलेल्या शेतीला कम्पाउंड असावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. 

प्रतिमेत याचा समावेश असू श्‍ाकतो: आकाश आणि बाहेरील
आदासा या तीर्थस्थळी संपूर्ण राज्यातून भाविक येतात.

 

आदासा, धापेवाडा, वाकीचा विकास व्हावा

 मतदारसंघातील आदासा, धापेवाडा आणि वाकी या तीर्थस्थळी केवळ विदर्भातूनच नव्हे, तर संपूर्ण राज्यातून भाविक येतात. त्यामुळे या भागाचा प्राधान्याने विकास होणे गरजेचे आहे. मंदिर परिसरात विश्रामगृह, हॉटेल्स आदींची उत्तम व्यवस्था केली तर स्थानिकांना रोजगार मिळू शकतो. 

 बरीच कामे झाली, काही प्रस्तावित 
आमदार सुनील केदार यांनी कोट्यवधींचा निधी खेचून आणला. त्यांच्या मार्गदर्शनात जिल्हा परिषदेत विरोधी पक्षनेतेपद भूषवीत असताना ग्रामीण जनतेसाठी स्वच्छता, आरोग्य, पाणीपुरवठा रस्ते व शेतकऱ्यांसाठी पांदण रस्ते आदी मूलभूत सुविधांची कामे प्रस्तावित आहेत. जिल्हा परिषदेअंतर्गत विविध लाभान्वित योजनांमध्ये 75 टक्‍के सबसिडी द्यावी व डीबीटी योजना रद्द करून शेतकऱ्यांना थेट लाभ द्यावा. स्थानिक प्रतिनिधी जनतेच्या कामांकडे लक्ष देतात की नाही, याकडे आमदारांचे लक्ष असते. 
मनोहर कुंभारे,
माजी जिल्हा परिषद विरोधी पक्षनेते

 
आमदारांचे कार्य प्रशंसनीय 
खुबाळा मार्गावरील मानसिंग देव अभयारण्यात येणारे पर्यटक, शालेय विद्यार्थी व नागरिकांसाठी रस्ता बांधकामासाठी 2 कोटी 47 लाख रुपयांचा निधी मिळवून दिला. पर्यटकांसाठी विश्रामगृहाचे बांधकाम सुरू आहे. खुबाळा रस्त्याला दोन कोटी दोन लाख रुपयांच्या निधीची मंजुरी तसेच हिंगणा ते खुबाळा बडेगावपर्यंतच्या रस्त्याला 53 लाख रुपये उपलब्ध करून दिले. जलसंधारण व लघुसिंचन विभागातर्फे खुबाळा गटग्रामपंचायतीअंतर्गत असणाऱ्या हिंगणा गावालगत नाल्याचे खोलीकरण व सरळीकरण आणि आवारभिंतीचे काम सुरू आहे. 
-यादव ठाकरे, सरपंच, गटग्रामपंचायत खुबाळा 

प्रकल्पग्रस्तांना मदत 
शेतीचे सिंचन, उद्योग व पिण्याच्या पाण्यासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या कोच्छी जल प्रकल्पाचे बांधकाम सुरू आहे. येथील प्रकल्पग्रस्त प्रशासनाच्या चुकीमुळे गावठाणातील घरांना झुडपी जंगलात दाखविण्या ची चूक केल्याने न्यायासाठी भटकत असताना आमदारांनी पुढाकार घेत अनेकांना न्याय मिळवून दिला. शेतजमिनीसाठी प्रशासनाला वेठीस धरून प्रकल्पग्रस्तांना सहकार्य केले. जनतेच्या छोट्या-मोठ्या समस्या मार्गी लावणे हीच त्यांच्या विकासाची पावती आहे. 
छाया चंदू बनसिंगे, माजी सरपंच कोच्छी 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jantecha jahirnama saoner matadarsangha