अकरावीतील जतीनला म्हशीचे दूध काढण्याची आवड

दिनकर गुल्हाने
सोमवार, 11 फेब्रुवारी 2019

पुसद, यवतमाळ - मुलांना अलीकडे मोबाईलचे वेड पाहावयास मिळते. वेगवेगळे ॲप्स व गेम्स यातून त्यांना वेळच मिळत नाही. मग घरकाम व अभ्यासाला फुरसत कशी बरे मिळणार? अकरावी विज्ञानचा जतिन आहाळेचा किस्सा मात्र वेगळा आहे. पूस नदीतीरावरील शेतातील गोठ्यात जतीनचे वडील नितीन यांच्या पाच दुभत्या म्हशी आहेत. या म्हशींच्या देखभालीसह त्यांचे दूध काढण्याची आवड जतिनने जोपासली आहे.

पुसद, यवतमाळ - मुलांना अलीकडे मोबाईलचे वेड पाहावयास मिळते. वेगवेगळे ॲप्स व गेम्स यातून त्यांना वेळच मिळत नाही. मग घरकाम व अभ्यासाला फुरसत कशी बरे मिळणार? अकरावी विज्ञानचा जतिन आहाळेचा किस्सा मात्र वेगळा आहे. पूस नदीतीरावरील शेतातील गोठ्यात जतीनचे वडील नितीन यांच्या पाच दुभत्या म्हशी आहेत. या म्हशींच्या देखभालीसह त्यांचे दूध काढण्याची आवड जतिनने जोपासली आहे.

दुभत्या म्हशीचे दूध काढणे, तसे हे सोपे काम नाही. म्हशीच्या कासेतून दुधाची धार काढण्याचे कसब व त्यासाठी लागणारी शक्ती भल्याभल्यांना जमत नाही. मात्र, दुभत्या म्हशीचे दूध जतिन सहजतेने काढतो. त्याच्या गोठ्यातील पाच म्हशी सकाळी आणि संध्याकाळी ५० लिटर दूध देतात. त्यातील निम्मे दूध जतिन आपल्या बोटांनी लीलया काढतो, तेही कमी वेळात. आठवीत असतानाच त्याला ही किमया साधली. 

जतिनचे वडील नितीन हे शेतकरी आहेत. शेतीपूरक व्यवसाय म्हणून त्यांनी गोठ्यावर म्हशीपालन केले आहे. दुग्ध व्यवसायातून त्यांच्या घराला मोठा आर्थिक हातभार लागतो. हा व्यवसाय पिढीजात असून गाई-म्हशींचा ते गोठ्यावर सांभाळ करतात. नितीन स्वतः म्हशीचे दूध काढत आणि ग्राहकांना दूध विक्री करीत. वडिलांसोबत जतिनलाही म्हशींचा लळा लागला. गोठ्यात म्हैस व्याली की तिच्या वगारूशी जतिनची मैत्री झालीच म्हणून समजा. वगारू दूध पीत असताना जतिनने दूध काढण्याचा प्रयत्न केला. धारोष्ण दुधाची धार त्याच्या अंगावर उडाली. जतिनला गंमत वाटली आणि म्हशीचे दूध काढण्याचा आग्रह जतिनने वडिलांकडे धरला. पुढे म्हशीचे दूध काढण्यात जतिनला आनंद वाटू लागला. कधी गड्यासोबत तर कधी वडिलांसोबत दूध काढण्याचा छंद त्याला जडला. 

शाळेचा अभ्यास सांभाळत जतिन दररोज दूध काढतो. या छंदासोबतच दुग्ध व्यवसायाचे तंत्रही त्याने आत्मसात केले आहे. दुधाची विक्री घरपोच करण्यात येते . त्याचा हिशेब जतिन ठेवतो. तसेच म्हशींना लागणारी खुराक, कुटार या सगळ्या व्यवस्थेवर तो लक्ष ठेवतो. दूध विक्रीतून मिळणारे उत्पन्न तो बॅंकेत जमा करतो. प्रतिदिन तीन हजार रुपयांची मिळकत याद्वारे होते. जतिनला दुग्धव्यवसायात रस निर्माण झाला असून या व्यवसायाचा विस्तार करण्याची त्याची मनीषा आहे. सध्या अकरावी विज्ञान शाखेत शिकत आहे. पुढे पशुवैद्यकीय शाखेत पदवी मिळविण्याचा जतिनचा मानस आहे.

Web Title: jatin likes to milking of buffalos