जवानांना साश्रुनयनांनी निरोप

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 फेब्रुवारी 2017

अकोला/माना (ता. मूर्तिजापूर) - काश्‍मीरमधील गुरेझ सेक्‍टरमध्ये झालेल्या हिमस्खलनात मृत्यू झालेल्या आनंद गवई व संजय खंडारे या दोघा जवानांना हजारोंच्या जनसमुदायाने साश्रुनयनांनी आज निरोप दिला. आनंद यांच्यावर मोर्णेच्या नदीकाठावरील स्मशानभूमीत, तर संजय यांच्यावर मूर्तिजापूर तालुक्‍यातील त्यांच्या माना या गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

बांदीपुरा जिल्ह्यातील गुरेझ सेक्‍टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ झालेल्या हिमस्खलनात मूर्तिजापूर तालुक्‍यातील जवान संजय व वाशीम बायपास परिसरातील पंचशीलनगर येथील आनंद यांचा मृत्यू झाला. श्रीनगरहून विशेष विमानाने जवानांचे पार्थिव आधी नागपूर व त्यानंतर मंगळवारी रात्री अकोल्यात आणण्यात आले. आज सकाळी दोन्ही कुटुंबीयांच्या ताब्यात दोघांचे मृतदेह देण्यात आले. त्यानंतर हजारोंच्या उपस्थितीत दोघांचीही अंत्ययात्रा निघाली. पोलिस दल व लष्कराच्या जवानांनी सलामी दिली. आनंदचे वडील शत्रुघ्न व भाऊ धनंजय या दोघांनी त्यांना अग्नी दिली. संजय यांना त्यांचा आठ महिन्यांचा चिमुकला आदर्श याने अग्नी दिला.

अकोल्यात प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, पोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी, तर माना येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण विधळे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कॅप्टन दीपक खंडारे यांनी श्रद्धांजली वाहिली. या वेळी लोकप्रतिनिधी, माजी सैनिकांच्या विविध संघटनांचे पदाधिकारी व विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

आनंद व संजय यांचे पार्थिव स्मशानभूमीत जात असताना नागरिकांनी दिलेल्या भारतमाता की जय, वंदे मातरम्‌ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

Web Title: jawan last rites