मोठी बातमी : दहशतवादी हल्ल्यात बुलडाणा जिल्ह्यातील जवान शहीद

c. b. bhakre.jpg
c. b. bhakre.jpg

बुलडाणा : एकीकडे देशात कोरोना संकट तर दुसरीकडे सीमेवर दहशतवाद अशा दुहेरी संकटातून जात असलेल्या देशाचे रक्षण करताना जम्मू काश्मीर भागातील बारामुल्ला सोपोरा एरीयामध्ये दहशतवाद्यांनी आज (ता.18) हल्ला चढविला. या हल्ल्यात सीआरपीएफचे तीन जवान शहीद झाले असून, त्यातील एक बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा येथील असल्याचे कळते.

बारामुल्ला परिसरातील सोपोरा परिसरात आज (ता.18) सकाळी अचानक सीआरपीएफ जवानाच्या तुकडीवर दहशतवाद्यांनी हल्ला चढविला. बेछूट गोळीबार करण्यात आल्यानंतर लष्कराने परिसराला घेराव घालत दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. दरम्यान, या हल्ल्यात बिहार राज्यातील वैशाली येथील 42 वर्षीय राजवीर शर्मा, महाराष्ट्रातील बुलडाणा जिल्ह्यातील 38 वर्षीय सी. बी भाकरे आणि गुजरात राज्यातील साबरकांठा येथील परमार सत्यपाल सिंह यांचा समावेश आहे. याबाबत अधिकृतरीत्या माहिती सीआरपीएफ प्रवक्त्यांनी दिली. 

बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा बुद्रूक येथील चंद्रकांत भगवंतराव भाकरे हे सैन्य दलात गेल्या 2002 मध्ये दाखल झाले होते. त्यांना पत्नी, एक मुलगी व एक मुलगा असून, ते सध्यास्थितीत सैन्य दलाच्या पुण्यातील कॅम्प येथे राहतात. पातुर्डा बुद्रूक सारख्या लहान गावातून सैन्य दलात दाखल होत लहानपणापासून त्यांनी देशसेवेचे व्रत घेतले होते. गावात त्यांना बंटी नावाने एक जिव्हाळ्याची ओळख होती. सतत देशासाठी काही करण्याची त्यांची धडपड होती. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात त्यांना हुतात्म आल्याने संध्याकाळपासून संपूर्ण संग्रामपूर तालुक्यावर शोककळा पसरली आहे. 

गेल्या वर्षी सिंदखेडराजा तालुक्यातील गोवर्धन नगर नितीन राठोड व मलकापूर येथील संजय राजपूत यांच्यासह सैनिकांवरही पुलवामा परिसरात अशाच प्रकारे दहशवाद्यांने आत्मघातकी हल्ला चढविला होता. यानंतर बालामुल्ला परिसरात आज झालेल्या हल्ल्यात झालेल्या हल्ल्यातही आत्मघातकी प्रकार घडला वर्तविला जात असून, नेमकी दहशतवाद्यांची संख्या, हेतू आणि कोणत्या संघटनेसोबत संबंध आहे याचा शोध सीआरपीएफ विशेष मोहिमेतील पथक घेत आहे. 

परिसराला सीआरपीएफ जवानासह जम्मू व काश्मीर पोलिसांनीही घेराव घातला असून, संध्याकाळपर्यंत लपलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यात येत होता. यामध्ये प्रतिउत्तरात काही दहशतवाद्यांना ठारही करण्यात आल्याचे कळत असले तरी, त्याबाबत अधिकृतरीत्या कोणताही दुजोरा मिळालेला नाही. दरम्यान, चंद्रकांत भाकरे यांचे पार्थिव विशेष विमानाने औरंगाबाद येथे आणण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले असून, त्यांच्या परिवारालाही पुण्याहून गावाकडे आणण्यासाठी लॉकडाउन पाहता तत्काळ कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com