भाजपनेच रेंगाळत ठेवला आरक्षणाचा प्रश्‍न

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

वर्धा : भाजप सरकारने मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम या समाजघटकांना निवडणूक प्रचारावेळी मते मिळविण्यासाठी आरक्षणाचे आश्‍वासन दिले; परंतु चार वर्षांचा कालावधी लोटला तरी अद्याप आरक्षण जाहीर केलेले नाही. भाजपने आरक्षणाचा प्रश्‍न रेंगाळत ठेवला. त्यामुळे समाजात तेढ निर्माण झाले आहे, असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केला.

येथील शिववैभव सभागृहात गुरुवारी (ता.16) राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळाव्यास आले असता आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जिल्हा नेते माजी आमदार प्रा. सुरेश देशमुख, आमदार प्रकाश गजभिये, आमदार अनिल देशमुख, माजी आमदार राजू तिमांडे, ऍड. सुधीर कोठारी, किशोर माथनकर, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष समीर देशमुख उपस्थित होते.
जयंत पाटील पुढे म्हणाले, आम्ही सत्तेत असताना नारायण राणे समितीने केलेल्या शिफारशीनुसार राज्यात आरक्षण लागू केले; परंतु हा विषय आता न्यायप्रविष्ट आहे. भाजप सरकारने गेल्या चार वर्षांपासून मागासवर्गीय आयोगाकडे पाठपुरावा केला नसल्यामुळेच आजपर्यंत मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लागू शकलेला नाही.
व्होटिंग मशीनऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्यास राज्यासह देशात आघाडीची सत्ता येईल, असा दावा त्यांनी केला. सध्या भाजप गोटातच संभ्रमाचे वातावरण आहे. येत्या काळात मोदी पंतप्रधान होतील की नाही, याविषयी सत्ताधाऱ्यांनाच शंका आहे.
येत्या विधानसभा, लोकसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस पक्षासोबत चर्चा केल्यानंतर राष्ट्रवादी प्रत्यक्षात किती जागा लढणार, हे स्पष्ट होईल. दिल्लीत संविधान जाळल्याचे प्रकरण घडल्यानंतरही शासनाने केवळ बघ्याची भूमिका घेतली, असा आरोप त्यांनी केला.
समीर देशमुखांना उमेदवारी
आता तरुण नेतृत्वांच्या पाठीशी राहणे आवश्‍यक आहे. समीर देशमुख यांची साथ द्या, येत्या निवडणुकीत पक्ष त्यांना उमेदवारी देणार आहे. बूथनिहाय सदस्य नोंदणीचा प्रारंभ सेवाग्राम येथून करण्यात आला. आतापर्यंत 15 हजार बूथ कमिटी सदस्य झाले आहेत. युवकांना अधिकाधिक संधी देऊन राज्यात राष्ट्रवादीची स्थिती मजबूत करू, असे प्रतिपादन जयंत पाटील यांनी केले.

Web Title: jayant patil mews