जेईई ऍडव्हान्स आज

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 मे 2017

विदर्भातून पाच हजारांवर विद्यार्थी

विदर्भातून पाच हजारांवर विद्यार्थी
नागपूर - इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी (मद्रास) तर्फे देशातील 23 आयआयटींमध्ये प्रवेशासाठीची "जेईई ऍडव्हान्स' परीक्षा उद्या रविवारी सकाळी नऊ ते दुपारी पाचदरम्यान विविध केंद्रांवर होईल. परीक्षेचा निकाल 11 जूनला घोषित होणार आहे. "नीट'प्रमाणेच याही परीक्षेसाठी बऱ्याच सूचना देण्यात आल्याने विद्यार्थ्यांची दमछाक होणार आहे.

"जेईई मेन'चा निकाल 27 एप्रिल रोजी घोषित करण्यात झाला. एकूण विद्यार्थ्यांपैकी 2 लाख 20 हजार विद्यार्थी "जेईई ऍडव्हान्स'साठी पात्र ठरले. या विद्यार्थ्यांना 28 एप्रिलपासून परीक्षेसाठी नोंदणी करावयाची होती. याशिवाय दोन ते चार जूनपर्यंत विलंब शुल्कासह नोंदणी करता येणे शक्‍य होते. उद्या रविवारी सकाळी 9 ते 12 दरम्यान पहिला पेपर तर दोन ते पाचदरम्यान दुसरा पेपर होईल. परीक्षेसाठी किमान अर्धा तास अगोदर विद्यार्थ्यांना केंद्रावर पोहचायचे आहे.

गेल्यावर्षी "जेईई ऍडव्हान्स'साठी अडीच लाख विद्यार्थी पात्र ठरले होते. यावर्षी ती संख्या दोन लाख वीस हजारांवर आहे. यातून पात्र ठरणाऱ्यांना आयआयटी, एनआयटी, ट्रिपल आयटी आणि सीएफटीआयच्या प्रवेश दिला जाईल. या परीक्षेच्या गुणांकनात बारावीच्या परीक्षेतील गुणांचा समावेश केला जाणार आहे.

विभागाचा टक्का वाढला
"जेईई मेन'साठी सीबीएसईने परीक्षा पद्धतीत बरेच फेरबदल केले आहेत. तसेच "जेईई मेन'मधील गुणांच्या आधारावर देण्यात आलेल्या "रॅंकिंग'मध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थी सरस ठरले आहेत. विभागात गतवर्षीच्या तुलनेत दुपटीने विद्यार्थी पात्र ठरले आहेत. "जेईई ऍडव्हान्स'साठी पात्र ठरलेल्या सर्वाधिक विद्यार्थ्यांच्या यादीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. नागपूरसह विदर्भातील इतर जिल्ह्यांतून पाच हजारावर विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. एकट्या नागपुरातील पात्र विद्यार्थ्यांची संख्या हजार ते पंधराशेवर आहे. हे विद्यार्थी उद्या "जेईई ऍडव्हान्स' परीक्षा देतील.

सूचनांचा भडीमार
वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या "नीट' परीक्षेप्रमाणेच या परीक्षेसाठीही विविध सूचना देण्यात आल्या आहेत. विद्यार्थिनींना ब्रेसलेट, बांगड्या, चेन, कानातले, नोज पॉइन्ट, नेकलेस, इलेक्‍ट्रॉनिक्‍स घड्याळ, पेन्डन्ट, हेअर बॅन्ड, बॅग, ब्रोचेस, हेअरपिन, बिग बटन्स, पूर्ण बाह्यांचे कपडे, रायटिंग पॅड, जोडे घालून येण्यास मनाई आहे. याशिवाय परीक्षेला येताना डाउनलोड केलेल्या आयकार्डसोबत आयडी प्रूफ व आधार कार्ड घेऊन येणे आवश्‍यक असल्याचे कळविण्यात आले आहे.

Web Title: jee advance exam today