परंड्यातील शेतकऱ्यांची 'भाकरी' महागली

परंड्यातील शेतकऱ्यांची 'भाकरी' महागली

परंडा : दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. ज्वारीचे कोठार म्हणून ओळख असलेल्या परंडा तालुक्यात 'भाकरी' महागली आहे. तालुक्यात ज्वारीचा भाव सध्या प्रतिक्विंटल चार हजार रुपयांपर्यंत गेला आहे. महिनाभरात एक हजार 200 ते एक हजार 300 रुपये भाव वाढला आहे.

रब्बीचा तालुका असल्याने राज्यात परंडा तालुक्यातील ज्वारी प्रसिद्ध आहे. प्रामुख्याने तालुक्यातील सिरसाव, जवळा (नि.), वाकडी या भागांतील ज्वारीला बार्शी (जि. सोलापूर) येथील आडत बाजारात सर्वाधिक भाव मिळतो. गेल्या काही वर्षांत तालुका परिसरात मोठ्या प्रमाणात सिंचनाच्या सोयी झाल्याने या भागातील शेतकरी ऊस पिकाकडे वळला. त्यामुळे वर्षांनुवर्ष रब्बीचे ज्वारीचे क्षेत्र कमी होऊ लागले. खरीप पिके घेण्याकडे तालुक्यातील शेतकऱ्यांचा ओढा वाढला. मात्र पावसाने दगा दिल्याने ऊसाचे पिक वाळू लागले आहे. खरिपाचे उत्पन्न उत्पादन खर्च निघेल इतकेही झाले नाही तर पावसाअभावी जमिनीत ओलच नसल्याने यंदा रब्बीची पेरणी एक टक्केच झाली आहे. त्यामुळे ज्वारीच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होणार असल्याने गेल्या महिनाभरापासून ज्वारीचे भाव झपाट्याने वाढु लागले आहेत.

दुष्काळाचे सावट गडद होऊ लागताच शेतकऱ्यांनी ज्वारीची विक्री केली आहे. त्यामुळे अपवाद वगळता शेतकऱ्यांकडे ज्वारीच नाही. ज्वारीला भाव असला तरी शेतकऱ्याला त्याचा फायदा नाही. उलट दुष्काळात महाग ज्वारी घेण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. दुष्काळी स्थिती अन् महागाई वाढलेल्या परिस्थितीत चटणी-भाकरीवर जगता येईल, या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांची 'भाकरी'ही महागली आहे. महिनाभरापूर्वी ज्वारीचा दर प्रतिक्विंटल दोन हजार 700 ते दोन हजार 800 रुपये होता. मात्र आता हाच भाव चार हजारांवर गेला आहे.

परंडा तालुका व परिसर सत्तरच्या दशकात ज्वारीचे कोठार असल्याने वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना अन्य भागांत दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली असताना शासनाने लाखों क्विंटल ज्वारी परंडा, भूम तालुक्यांतून खरेदी केली होती. या भागातील नागरिकांना आता ज्वारीची भाकरी खाणे अवघड झाले आहे.

- पोपटराव गटकुळ, शेतकरी, खानापूर, ता. परंडा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com