जिल्हा कबड्‌डी संघटनेत "ले पंगा'!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

जिल्हा कबड्‌डी संघटनेत "ले पंगा'!
मानकापुरातील स्पर्धा बेकायदेशीर असल्याचा मदन रतन यांचा दावा

जिल्हा कबड्‌डी संघटनेत "ले पंगा'!
मानकापुरातील स्पर्धा बेकायदेशीर असल्याचा मदन रतन यांचा दावा

नागपूर : नागपूर जिल्हा कबड्‌डी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये चार दशकापासून असलेला वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. यावेळी मदन रतन विरुद्ध गिरीश व्यास असा सामना रंगला आहे.
या संदर्भात मदन रतन यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली स्थिती स्पष्ट केली. विदर्भ हौशी कबड्‌डी संघटनेने नागपूर जिल्ह्यातील कबड्‌डी संचालनाचे सर्वाधिकार मला दिले आहे. मी जिल्हा संघटनेचा अध्यक्ष असा दावा, मदन रतन यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला. मानकापूर येथील विभागीय क्रीडासंकुलात 16 ऑगस्टपासून सुरू होत असलेली जिल्हा निवड चाचणी कबड्‌डी स्पर्धा अवैध असल्याचेही त्यांनी सांगितले.
मदन रतन म्हणाले, सद्यस्थितीत नागपूर जिल्हा संघटनेचा मीच अध्यक्ष आहे. माझ्या नेतृत्वातील कार्यकारिणीला विदर्भ कबड्‌डी संघटनेचे सचिव जितेंद्र ठाकूर यांनी मान्यता दिली आहे. तशा आशयाचे पत्रदेखील उपलब्ध आहे. मी 2011 मध्ये राजीनामा दिला असे म्हटले जात असले तरी, राजीनामा स्वीकारण्यात आला की नाही, याबद्दल कुणीही मला कळविले नाही. त्यासंदर्भात पत्रसुद्धा मिळालेले नाही. मी अध्यक्ष असल्याची नोंद धर्मादाय आयुक्‍त कार्यालयात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कबड्‌डीचे सर्व अधिकार फक्‍त माझ्याकडेच आहे.
मदन रतन यांनी यावेळी गिरीश व्यास यांच्या अध्यक्षतेखालील कार्यकारिणीवर अनेक आरोप केलेत. ते म्हणाले, विदर्भ संघटनेशी न बोलता गेल्या कित्येक वर्षांपासून ते आपला व्यवहार करीत आहेत. ते स्वत:ला अध्यक्ष मानतात. परंतु, त्यांच्याकडे यासंदर्भातील कोणताच कागदी (अधिकृत) पुरावा उपलब्ध नाही. विविध संघांकडून स्पर्धांसाठी घेण्यात येणाऱ्या संलग्न व प्रवेशशुल्काचा हिशेब त्यांच्याकडे नाही. येत्या 16 ऑगस्टपासून मानकापूर येथे विभागीय क्रीडासंकुलात आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा निवड चाचणी कबड्‌डी स्पर्धेला विदर्भ संघटनेची मान्यता नाही. त्यामुळे ही स्पर्धा बेकायदेशीर असून, फसवणूक टाळण्यासाठी जिल्ह्यातील कोणत्याही संघाने स्पर्धेत सहभागी होऊ नये असे आवाहन त्यांनी केले. स्पर्धेत प्रवेश निश्‍चित करण्यापूर्वी विदर्भ संघटनेकडे योग्य शहानिशा करावी, असे ते म्हणाले. आमच्या कार्यकारिणीची लवकरच बैठक होणार आहे. त्यात जिल्ह्यातील खेळाडूंसाठी नवी स्पर्धा घोषित करणार असल्याचे रतन यांनी यावेळी सांगितले. पत्रकार परिषदेला रतन यांच्या संघटनेचे सहसचिव सुधाकर राऊत, प्रवीण देशमुख, उपाध्यक्ष सुधाकर कोळसे, सदस्य प्रशांत जालंधर, प्रकाश बांते आदी उपस्थित होते.

Web Title: kabaddi news