जन्मठेप झालेल्या अकोल्याच्या रणजितसिंग चुंगडेचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 सप्टेंबर 2019

अमरावती : अकोला येथील व्यापारी किशोर खत्री याच्या हत्येप्रकरणी अकोला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावलेल्या एका कामगार संघटनेचा नेता रणजितसिंग गुलाबसिंग चुंगडे (वय 66, बंदी नं. 5052) याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्‍याने मृत्यू झाला. चुंगडेवर इतरही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होते. सोमवारी (ता. 16) सकाळी साडेसहा ते सातच्या सुमारास ही घटना घडली.

रणजितसिंग याला जुलै 2017 मध्ये जन्मठेपेची शिक्षा झाली. तेव्हापासून त्याला अमरावती येथील मध्यवर्ती कारागृहात ठेवले होते. सोमवारी अचानक छातीत दुखायला लागल्यावरून त्याला उपचारासाठी अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान चुंगडे याचा मृत्यू झाला. चुंगडे व अकोला येथील व्यापारी खत्री यांच्यात घटनेच्या अनेक वर्षांपासून वाद सुरू होता. जुनेशहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली होती. त्यात रणजितसिंग चुंगडेसह, पोलिस कर्मचारी जसवंतसिंग चव्हाण व राजू मेहरे, रूपेश चंदेल यांना अटक झाली होती. न्यायालयाने चुंगडे व जस्सी यांना दोषी समजून सन 2017 मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. कारागृह प्रशासनाने चुंगडेच्या मृत्यूची माहिती त्यांच्या नातेवाइकांना दिली. अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात आवश्‍यक ती कागदोपत्री कारवाई केल्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात पाठविले जाईल, असे कारागृहाचे अधीक्षक रमेश कांबळे यांनी सांगितले.
एसडीपीओंवरही गोळी चालविल्याचा आरोप
रणजितसिंग चुंगडे यांनी अकोला येथील तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी लक्ष्मीनारायण यांच्यावर 1993 मध्ये गोळी चालविल्याचा आरोप आहे. त्यात आठ वर्षांची शिक्षा त्यांना झाली होती. उच्च न्यायालयातून रणजितसिंगला जामीन मिळाला होता.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kaidi Ranjit Singh Chungde dies of heart attack