खारपाणपट्ट्याचा चक्रव्यूह भेदणारं गाव काकोडा...

पंजाबराव ठाकरे
शनिवार, 14 जुलै 2018

शेततळे, नाला खोलीकरण, सीसीटी, कंटूर बांध, छोटे माती बांध हे सर्व उपचार त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केले. मागील दोन दिवसांत काकोड्यात चांगला पाऊस झाला. सगळी जलसंधारणाची कामे पाण्याने भरून गेली. धावते पाणी थांबले. हळूहळू ते जमिनीत मुरायला लागले आणि पाणलोट विकासाच्या कामांनी जादू दाखवायला सुरवात केली.

संग्रामपूर : बुलडाणा जिल्ह्यातील काकोडा गाव पूर्णा नदीच्या खारपाणपट्ट्यात येते. म्हणजेच या गावातली माती आणि पाणी दोन्ही खारं आहे. या पाण्यामुळे बहुसंख्य गावकरी किडनीच्या आजाराने ग्रस्त आहेत. गावातील अनेक बोअर ५० फुटांच्या खाली गेल्याने हे क्षारयुक्त पाणी त्यांना लागले आणि ते पाणी प्यायल्याचा परिणाम गेल्या १५ वर्षांत गावाने भोगला.

५० फुटांपेक्षा कमी खोल असलेल्या विहिरींमधील पिण्यायोग्य पाणी आटल्याने काकोडामध्ये पाणीटंचाईने डोके वर काढले. गावाला जवळच असलेल्या वारी हनुमान धरणातून पाणीपुरवठा होतो. व्हॉल्व्हवर पाणी भरण्यासाठी गावातील लोकांच्या लागलेल्या रांगा हे दृश्य तर नेहमीचंच. अशात या गावाने 'सत्यमेव जयते वॉटर कप २०१८' स्पर्धेत सहभाग घेतला आणि गावात जलसंधारणाचे काम करायला सुरवात केली. 

शेततळे, नाला खोलीकरण, सीसीटी, कंटूर बांध, छोटे माती बांध हे सर्व उपचार त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केले. मागील दोन दिवसांत काकोड्यात चांगला पाऊस झाला. सगळी जलसंधारणाची कामे पाण्याने भरून गेली. धावते पाणी थांबले. हळूहळू ते जमिनीत मुरायला लागले आणि पाणलोट विकासाच्या कामांनी जादू दाखवायला सुरवात केली.

केवळ दोन पावसांत गावातील विहिरींची पाणी पातळी कमालीची वाढली. गावातील नागरिक शत्रुघ्न मानखैर म्हणतात "अगोदर दोन खेप पाणी आणायला व्हॉल्व्हवर जावे लागत होतं, आत्ता घरच्या विहिरीवर हजार लिटरच्या दोन टाक्या भरतात, वारी धरणाच्या पाण्याची आमची गरज कमी झाली आहे."

उन्हाळ्यात ४७℃ च्या तापमानात काम करताना उन्हाने रापलेल्या काकोडावासीयांच्या चेहऱ्यावर आता पावसाने तृप्त झाल्याचा आंनद दिसू लागलाय. खारपाणपट्टयाचं चक्रव्यूह भेदण्याची सुरवात काकोड्याने केली आहे हे नक्की!

Web Title: Kakoda disturbs the water problems