कळमेश्‍वरच्या वाघाचा पोहरा जंगलात मुक्काम 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 जानेवारी 2017

नागपूर - नागपूर जिल्ह्यातील कळमेश्‍वर-कोंढाळीच्या राखीव जंगलातील वाघाने अमरावती जिल्ह्यातील पोहरा-मालखेडच्या राखीव जंगलात मुक्काम ठोकला आहे. कळमेश्‍वर-कोंढाळीच्या जंगलात "नवाब' या नावाने परिचित हा वाघ आता पोहरा-मालखेडच्या जंगलाचा "राजा' झाला आहे. डिसेंबर ते जानेवारीच्या मध्यान्हात या वाघ या परिसरात स्थिरावला आहे. 

नागपूर - नागपूर जिल्ह्यातील कळमेश्‍वर-कोंढाळीच्या राखीव जंगलातील वाघाने अमरावती जिल्ह्यातील पोहरा-मालखेडच्या राखीव जंगलात मुक्काम ठोकला आहे. कळमेश्‍वर-कोंढाळीच्या जंगलात "नवाब' या नावाने परिचित हा वाघ आता पोहरा-मालखेडच्या जंगलाचा "राजा' झाला आहे. डिसेंबर ते जानेवारीच्या मध्यान्हात या वाघ या परिसरात स्थिरावला आहे. 

पोहरा-मालखेडच्या जंगलात बऱ्याच वर्षांनी वाघाचे अस्तित्व दिसले. पोहरा ते कळमेश्‍वरच्या संचारमार्गाची संलग्नता लक्षात घेता अमरावती वनविभागाचे उपवनसंरक्षक हेमंत मीना यांनी मानद वन्यजीव रक्षक कुंदन हाते यांना कॅमेरा ट्रॅपमध्ये आलेली वाघाची छायाचित्रे पाठवली. ही छायाचित्र आणि कळमेश्‍वर-कोंढाळीतील वाघाचे छायाचित्र जुळले. अवघ्या एका दिवसात हा वाघ म्हणजेच, कातलाबोडीच्या विहिरीत पडलेल्या वाघिणीचा बछडा असल्याचे युवा संशोधक धनुषा कावलकर यांनी केलेल्या चाचणीनंतर सिद्ध झाले आहे. काही दिवसांपूर्वीच याच वाघिणीचा मोठा बछडा बोर व्याघ्र प्रकल्पात स्थलांतर करून गेल्याचे सिद्ध झाले होते. कळमेश्‍वर-कोंढाळीच्या जंगलात पूर्ण वाढ झाल्यानंतर वाघ त्याच्या नव्या अधिवासाच्या शोधात बाहेर पडल्याचे यावर स्पष्ट होत आहे. दोन वर्षे सहा महिने वयाच्या "नवाब'चे वर्तन त्याच्या नावाला शोभेलसेच आहे. कातलाबोडीच्या वाघिणीला "शिवानी' आणि "भवानी' नावाचे आणखी दोन मादा बछडे आहेत. "नवाब'ने आतापर्यंत त्यांच्यासोबत आपला अधिवास शेअर केला होता. वाघ त्यांचा अधिवास शेअर करत नसले तरीही हे तीनही वाघ एकत्र शिकार करत होते. 

कातलाबोडी येथे एका विहिरीत पडलेल्या वाघिणीला राखीव जंगलात सोडण्याचा पहिला प्रयोग राज्यात केला. त्याचा मागोवा घेतल्यानंतर सुरक्षिततेमुळे अनेक बछड्यांना जन्म दिला. त्यातील दोघांची पूर्ण वाढ झाल्यावर ते नव्या अधिवासाच्या शोधात बाहेर पडले. एका राखीव जंगलाचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने केले, तर त्याचे अतिशय चांगले परिणाम मिळू शकतात. कळमेश्‍वर-कोंढाळीच्या राखीव जंगलातील वाघाचे स्थलांतरण हे त्याचेच उदाहरण आहे, असे मत मानद वन्यजीव रक्षक कुंदन हाते यांनी व्यक्त केले.

Web Title: Kalmeshwar-kondhali the forest