कमलनाथ यांचे नागपूर कनेक्‍शन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 डिसेंबर 2018

नागपूर - मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची उद्या (ता.17) रोजी शपथ घेत असलेले कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांचे नागपूरशी जवळचे संबंध असून ते गेल्या चौदा वर्षांपासून नागपुरात इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्‍नोलॉजी (आयएमटी) ही संस्था चालवित आहेत. व्यवस्थापनाच्या क्षेत्रात या महाविद्यालयाचा पहिल्या 20 महाविद्यालयांमध्ये समावेश होतो. तब्बल 15 वर्षांनी मध्य प्रदेशात कॉंग्रेसची विजयी पताका फडकविण्यात कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून कमलनाथ यांची प्रमुख भूमिका राहिली. मध्य प्रदेशची धुरा सांभाळणारे कमलनाथ यांचे नागपूरशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध राहिले आहेत, त्यांचा छिंदवाडा मतदारसंघ हा नागपूर जिल्ह्याला लागून आहे. या मतदारसंघातील अनेक भागात मराठी भाषक मोठ्या प्रमाणावर आहेत.

कमलनाथ प्रत्येक निवडणुकीत या भागातील मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी नागपुरातील अनेक नेत्यांना बोलावितात. आमदार सुनील केदार (सावनेर, जि. नागपूर) यांच्याकडे या भागातील प्रचाराची जबाबदारी असते. याशिवाय राज्यातील नेतेही छिंदवाडा येथे आवर्जून जातात. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण यांच्यासह विदर्भातील बहुतेक नेत्यांनी कमलनाथ यांच्या मतदारसंघात प्रचार केला आहे. कमलनाथ यांच्या शपथग्रहण समारंभाला उपस्थित राहण्यासाठी सुनील केदार भोपाळला रवाना झाले आहेत.

Web Title: Kamalnath Nagpur Connection Politics