"कनक'चे कर्मचारी नव्या कंपनीतही कायम

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019

नागपूर : कनक रिसोर्सेस मॅनेजमेंटच्या 50 वर्षे वयावरील कर्मचाऱ्यांनाही नव्या कंपन्या सेवेत सामावून घेणार, अशी ग्वाही आयुक्त अभिजित बांगर यांनी आज दिली. या कर्मचाऱ्यांना नव्याने दस्तऐवज देण्याचीही गरज नाही, अशी पुस्तीही आयुक्तांनी दिल्याने कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला. घराघरांतून कचरा गोळा करणाऱ्या कनक रिसोर्सेस मॅनेजमेंट लिमिटेडच्या 50 वर्षांवरील कर्मचाऱ्यांना नव्या कंपन्या नियुक्त करीत नसल्याने आज सर्वच कर्मचाऱ्यांनी महापालिकेवर धडक दिली होती. 

शहरात कचरा संकलनाचे काम "कनक'ला देण्यात आले होते. संपूर्ण शहरात एकच कंपनी कार्यरत असल्याने कंपनीने मोठ्या संख्येत कर्मचारी भरती केले. आता या कंपनीचे काम संपुष्टात येणार आहे. या कंपनीऐवजी मनपाने दोन कंपन्यांना कचरा संकलनाचे काम दिले आहे. या कंपनीकडून येत्या 15 नोव्हेंबरपासून कामास सुरुवात होणार आहे. नवीन कंपन्यांनी कामगारांकडून नव्याने दस्तऐवज मागितले आहे. तसेच 50 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या कामगारांची नियुक्ती करण्यासही नकार दिला होता. त्यामुळे या वयात दुसरे काम कुठे शोधणार? कुटुंबाचे काय होईल? अशी चिंता या कर्मचाऱ्यांना होती. अखेर आज कनकच्या कामगारांनी आयुक्त कार्यालयावर धडक दिली. यावेळी शिष्टमंडळाने आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेतली. कनकच्या जुन्या कर्मचाऱ्यांना सामावून घेताना ज्यांचे वय 50 वर्षांपेक्षा जास्त आहेत, अशांचाही मानवीय आधारातून विचार व्हावा, अशी मागणी या कर्मचाऱ्यांनी केली. मनपाने झोन क्र. 1 ते 5 अर्थात लक्ष्मीनगर, धरमपेठ, हनुमाननगर, धंतोली आणि नेहरूनगर या पाच झोनची जबाबदारी ए. जी. एन्व्हायरो प्रा. लि. आणि झोन क्र. 6 ते 10 अर्थात गांधीबाग, सतरंजीपुरा, लकडगंज, आसीनगर आणि मंगळवारी या झोनमधील कचरा संकलनाची जबाबदारी बीव्हीजी प्रा. लि. या कंपनीला दिली आहे. या दोन्ही कंपनीला सध्या कनकमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांची मदत घ्यावी लागणार आहे. 
सध्या कनकमध्ये 1700 कर्मचारी असून, गेल्या पंधरा वर्षांपासून ते कंपनीला सेवा देत आहेत. या कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्यासाठी नव्या कंपनीसोबत चर्चा करण्यात येईल, असे आश्वासन आयुक्तांनी दिले. तसेच निवृत्तीचे वय 60 वर्षे आहे. त्यामुळे 50 वर्षे वय असलेल्या कर्मऱ्यांना कमी करू नये, अशा सूचना आयुक्तांनी कंपनीला दिल्या आहेत. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kanak employee, NMC