कळमेश्वर-नागपूर महामार्ग प्रवाशांसाठी कर्दनकाळ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

कळमेश्वर( नागपूर ) : ठिकठिकाणी डांबर उखडून महामार्गाची दैन्यावस्था झाली आहे. वाहनचालकांना या मार्गावरून जीवघेणा प्रवास करावा लागत असताना शासन प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.

कळमेश्वर( नागपूर ) : ठिकठिकाणी डांबर उखडून महामार्गाची दैन्यावस्था झाली आहे. वाहनचालकांना या मार्गावरून जीवघेणा प्रवास करावा लागत असताना शासन प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.
कळमेश्वर नागपूर मार्ग अत्यंत वर्दळीचा आणि दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. दिवसाला हजारावर वाहने या मार्गावरून सुसाट धावतात. अशातच महामार्गावरील डांबर उखडून ठिकठिकाणी लहान-मोठे खड्‌डे पडले आहेत. या मार्गावर खड्ड्याचे जाळेच विणल्याचे दिसून येते. चालकांना इथून मार्गक्रमण करताना तारेवरची कसरत करावी लागते. खड्‌डे असल्याने या पावसाळ्याच्या दिवसात लहान खड्ड्यात पाणी जमा झाले असते. त्यामुळे वाहनचालकांना खड्ड्य्‌ांचा अंदाज येत नाही व गाड्या स्लीप होऊन अपघात लहान-मोठे होत असतात. कळमेश्वर नागपूर महामार्गावर "एज्युकेशनल झोन' झाला. मोठ्या प्रमाणात अभियांत्रिकी महाविद्यालय, विद्यालये मोठ्या प्रमाणात आहेत. कळमेश्वरपासून नागपूरजवळ असल्याने या महामार्गावर मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची वाहतूक होत असते. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. रस्ता खराब असल्यामुळे वाहने नादुरुस्त होते. महामंडळाच्या बसेस या मार्गावर नेहमी बंद पडत असतात. एकंदरीत मार्गाच्या दुरवस्थेमुळे फटका बसत आहे. या मार्गावर फेटरी, येरला, दहेगाव अशी छोटी-छोटी गावेसुद्धा आहेत. यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या फेटरी दत्तक गावाचासुद्धा समावेश आहे. हे विशेष. परंतु, गेल्या 5 वर्षांच्या कार्यकाळात कधी या मार्गाचा विचारच केला गेला नाही. तसेच या मार्गाने नागपूरवरून कळमेश्‍वर, काटोल, जलालखेडा, वरुड, मोर्शी, अमरावतीच्या गाड्या धावत असतात. या मार्गावर लहान-मोठे अनेक अपघात घडतात. यामध्ये काही जणांना अपंगत्व तर काहींचा मृत्यूसुद्धा झाला आहे. परंतु, प्रशासनाला याची कधीही जाग आली नाही. त्यामुळे या मार्गाच्या नूतनीकरणीकडे शासन प्रशासनाने लक्ष द्यावे व संभाव्य धोका लक्षात घेऊन या मार्गाचे नूतनीकरण करावे. तसेच हा मार्ग अरुंद असल्याने तातडीने याचे चौपदरीकरण करावे, अशी मागणी नागरिक करीत आहेत.  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kardeshwar-Nagpur highway for commuters