कस्तुरचंद पार्क होते युद्धभूमी.... वाचा इतिहास

File photo
File photo

नागपूर : कस्तुरचंद पार्कवर सध्या सौंदर्यीकरणाचे काम सुरू आहे. मैदानाच्या मध्यभागी असलेल्या ऐतिहासिक चबुतऱ्याच्या भोवती रस्ता बांधण्यात येत आहे. त्यासाठी चार फूट खोल खड्डा खोदण्यात आला असून, तेथे या तोफा आढळून आल्या. यासोबत दोन उखळी तोफा (मॉर्टर) व त्याचे स्टॅण्डदेखील सापडले आहेत. तोफा लांबच्या पल्ल्यासाठी तर मॉर्टर शत्रूवर जवळून मारा करण्यासाठी उपयोगात आणल्या जात होत्या.
या तोफा लष्कराच्या जवानांनी ज्या पद्धतीने हाताळून ताब्यात घेतल्या त्याबद्दलही नाराजी व्यक्त होत आहे. जवानांनी तोफा आदळून साफ केल्या. हा ऐतिहासिक खजिना आहे. त्याचे संशोधन केल्यास अनेक बाबी समोर येऊ शकतात. लष्कराच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलेल्या तोफांचे परीक्षण प्रसारमाध्यमांना तर सोडाच पण भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागालादेखील करू दिले नाही. हा समृद्ध वारसा क्रेनच्या साहाय्याने अलगद उचलण्याऐवजी जेसीबीच्या साहाय्याने उचलण्यात आला.
दुसरे रघुजी महाराज यांच्या काळात शहरात तोफांची निर्मिती व्हायची. सक्‍करदरा तलावाजवळ हा कारखाना होता. त्याकाळी येथे पंचवीसहून अधिक तोफा तयार करण्यात आल्या. या तोफा इंग्रजांच्या तोफांपेक्षा खडबडीत आणि कमी मारक क्षमतेच्या होत्या, अशी माहिती प्रसिद्ध इतिहास संशोधक डॉ. भा. रा. अंधारे यांनी दिली. दुसऱ्या रघुजी महाराजांच्या मृत्यूनंतर सीताबर्डी किल्ल्याच्या लढाईत या तोफा वापरण्यात आल्या. परंतु, तोफांच्या कमी मारक क्षमतेमुळे भोसले लढाईत हरले. लढाईनंतर अनेक तोफा, शस्त्र व दारूगोळा युद्धभूमी कस्तुरचंद पार्क येथे अनेक वर्षे पडून होत्या. गुरुवारी सापडलेल्या तोफा त्यातीलच असल्याची शक्‍यता डॉ. अंधारे यांनी व्यक्‍त केली.

तोफांचा व्यास दीड ते दोन फुटांचा
खोदकामात चार तोफा, दोन उखळी तोफा (मॉर्ट) आणि त्यांचे दोन स्टॅण्ड सापडले आहेत. या तोफा दहा फूट लांब असून, त्यांचा व्यास दीड ते दोन फुटांचा आहे. तर दोन मॉर्टर दोन फूट लांबीचे आहेत. याशिवाय त्याचे स्टॅण्डदेखील येथे आढळून आले आहेत.

सुरक्षेच्या दृष्टिकोनातून लष्कराने या तोफा ताब्यात घेतल्या. सायंकाळी लष्कराच्या अधिकाऱ्यांशी यासंदर्भात चर्चा केली. या तोफा शुक्रवारी पुरातत्त्व विभागाकडे सुपूर्द करण्यात येतील.
- रवींद्र ठाकरे, जिल्हाधिकारी.

 

आखणी तोफा असाव्यात अशी शक्‍यता
घटनेची माहिती मिळताच मुधोजी राजे भासले यांनी तोफांची पाहणी केली. तत्पूर्वी त्यांनी डॉ. भा. रा. अंधारे यांच्याशी चर्चा केली आणि संपूर्ण माहिती जाणून घेतली. पूर्वजांचा ऐतिहासिक वारसा बघून मुधोजी राजे भोसले यांच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्टपणे जाणवत होता. या भागात खोदकाम केल्यास तीसपेक्षा अधिक तोफा व पुरातन वस्तू मिळतील, अशी शक्‍यता आहे.

तोफांची बनावट मराठाकालीन आहे. कस्तुरचंद पार्कची जागा त्याकाळी युद्धभूमी होती. त्यामुळे येथे अशा अनेक वस्तू आढळू शकतात. त्यासाठी शास्त्रोक्त पद्धतीने उत्खनन होणे आवश्‍यक आहे. अन्यथा हा वारसा आपण कायमचा गमावून बसू शकतो. या भागात आणखी खोदकाम झाल्यास महत्त्वाची माहिती मिळू शकते.
- शिरीष देशमुख, इतिहास संशोधक.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com