केसुर्ली शिवारात वाघाची दहशत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जुलै 2019

वणी (जि. यवतमाळ) : शहरापासून सुमारे आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या केसुर्ली जंगलात वाघाने वासरू ठार मारल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे शेतात जाण्यास मजूर धजावत नसल्याने ऐन हंगामात शेतीची कामे खोळंबली आहेत.

वणी (जि. यवतमाळ) : शहरापासून सुमारे आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या केसुर्ली जंगलात वाघाने वासरू ठार मारल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे शेतात जाण्यास मजूर धजावत नसल्याने ऐन हंगामात शेतीची कामे खोळंबली आहेत.
मागील वर्षी वाघाने वणी परिसरात चांगलाच धुमाकूळ घातला होता. वेकोलि परिसर, केसुर्ली व शिरपूर परिसरात वाघाचे दर्शन झाल्याने नागरिक धास्तावले होते. त्यावेळी कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी अनेक जनावरांचा फडशा वाघाने पाडला होता. केसुर्ली हे गाव जंगलाने वेढले आहे. या जंगलात रोही, हरिण, रानटी डुक्कर, मोर असे प्राणी आहेत. चार महिन्यांपूर्वी या भागात वाघाचे वास्तव्य होते. त्यामुळे शेतात कामाला जाणारे शेतमजूर, गुराखी यांच्यामध्ये भीतीचे वातावरण होते. मात्र, तब्बल चार महिन्यांनी पुन्हा वाघ या परिसरात आला आहे. गुरुवारी निळकंठ राजूरकर यांच्या मालकीची कालवड जंगलात चरायला गेली असता वाघाने तिच्यावर हल्ला चढविला. यात कालवड जखमी होऊन तिचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती वन विभागाला कळविण्यात आली. त्यांनी पंचनामा करून या कालवडीवर वाघानेच हल्ला चढविल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

चार महिन्यांपूर्वी या परिसरात वाघाचे वास्तव्य होते. मध्यंतरी वाघ चंद्रपूरकडील जंगलात निघून गेला होता. मात्र, केसुर्ली जंगलात वासरावर झालेला हल्ला हा वाघानेच केल्याचे स्पष्ट आहे. परिसरातील गावात दवंडी पिटवून गावकऱ्यांना व गुराख्यांना जंगलात जाण्याची मनाई केली आहे. नागरिकांनी सतर्क राहावे.
- वि. जी. वारे
वनपरिक्षेत्र अधिकारी, वणी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kesurli is underTiger Terror

टॅग्स